अकोला : स्वच्छता पंधरवाड्यांतर्गत अकोला महानगर पालिकेकडून १ ऑक्टोबरला ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’मध्ये शुन्य कचरा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील १४ ठिकाणी नियोजन करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाडा २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे.
हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यातील पत्रकारांकडून ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण
१ ऑक्टोबरला स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत स्वच्छता अभियान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकोला महापालिकास्तरावर ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी अकोला रेल्वेस्थानक, बसस्थानक, हुतात्मा स्मारक, जनता बाजार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस लॉन, पोलीस अधीक्षक कार्यालय, कृषी विद्यापीठ, महाबीज, असदगड, गोरक्षण मार्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आदी भागांमध्ये स्वच्छता करण्यात येईल. या मोहिमेसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.