बुलढाणा : माटरगाव ( ता. शेगाव) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा समस्यांबाबत जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात अळी. यामुळे नरमलेल्या जिल्हा परिषदेने गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
चौफेर टीकेच्या धनी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी शिक्षण विभागाला हे निर्देश दिले . त्यानुसार गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर प्रकरणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ११ पालकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी व पोलीस तक्रार करणारे प्रकाश मुकुंद यांनी ही माहिती दिली. यापूर्वी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरावी व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांसह २ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन केले.
हेही वाचा >>> जंगलव्याप्त गावातील विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; म्हणतात, “बसेस वेळेवर पाठवा”
या आंदोलनाची दखल घेत सदर शाळेत पाच शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली. तसेच बांधकामासाठी दिड कोटी रूपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती नियमित पदभरती होईपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.