वाशीम : जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्याचा कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला दिला. त्या कंपनीने लपून छपून मुलाखती घेण्याचा घाट घातला होता. मात्र काही राजकीय व सामाजिक संघटनांनी हा गंभीर प्रकार उजेडात आणल्यानंतर कंपनीने सारवासारव करीत शुद्धिपत्रक काढून मुलाखती स्थगित केल्याचे सांगितले. वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक अशा विविध पदासाठी मुलाखत असल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारीत होताच अनेक प्रश्न उपस्थित करून कंपनीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता.
मात्र सदर जाहिरात मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झाल्याने आज शहरातील हॉटेल इव्हेंटो येथे दूरवरून अनेक विद्यार्थी मुलाखतीसाठी जमा झाले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे, राजू वानखेडे, संभाजी ब्रिगेडचे पठाण आदींनी कंपनीला धारेवर धरून जाब विचारला. यावेळी मनुष्य बळ पुरवठा करणाऱ्या कंपनीची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली.
पद भरती करण्याचा कंत्राट पुण्यातील यूनिटी पॉवर फॅसिलिटी प्रा. लि.या कंपनीला मिळाला. त्यांनी भरती करताना कोणती पद्धत वापरावी. कोणती नाही हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मात्र, कंपनीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची अंतिम यादी आमच्याकडे आल्यानंतर तिची शहानिशा करून नियुक्ती देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. -डॉ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम