लोकसत्ता टीम
नागपूर: ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट ‘क’मधील सरळसेवेची १८ संवर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, करोनाची साथ यामुळे जिल्हा परिषदेची पदभरती रखडली होती. त्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या जवळपास १८हून अधिक संवर्गातील विविध पदांसाठी जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. ५ ते २५ ऑगस्टदरम्यान उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील.
जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय ऑनलाईन परीक्षा होणार आहे. मात्र, यासाठी खुल्या वर्गाकडून एक हजार तर आरक्षित वर्गाकडून नऊशे रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासाठी शासनाचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी जागतिक बँकेच्या नावे उपरोधीकपणे पत्र लिहून महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज करण्यास पैशाचा तुटवडा जाणवत असल्याने कर्ज मंजूर करावी अशी मागणी केली आहे.
आणखी वाचा-काय म्हणता मटणापेक्षाही महाग? होय, श्रावणात मशरूमला १२०० रुपये किलोचा दर
या उपरोधिक अर्जातील मजकुरानुसर जागतिक बँकेच्या व्यवस्थापकांनी महाराष्ट्रातील युवा तरुणांचा गांभीर्याने विचार करून अर्जाची दखल घेत लवकरात लवकर कर्ज मंजूर करावे अशीही मागणी केली आहे.