यवतमाळ : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी आणि त्यांच्यात स्पर्धा परीक्षेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, शालेय जीवनातच त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी आणि भविष्यात हे विद्यार्थी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे यासाठी ‘महादीप’ परीक्षा उपक्रम राबवत आहे. या परीक्षेत जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या ५२ विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने विमानवारी घडवली असून, हे विद्यार्थी शुक्रवारी दुपारी दिल्लीस रवाना झाले.
गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग महादीप उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील दोन हजार २०० शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातो. यावर्षी जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला. केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर या परीक्षेची फेरी झाली. जिल्हा स्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना विमानवारी घडविण्यात येत आहे.
यावर्षी ५२ विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी आदींच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना रवाना करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे विद्यार्थी नागपूरमार्गे दिल्ली येथे विमानाने रवाना झाले. हे विद्यार्थी दिल्ली, आग्रा येथे भेट देणार आहेत. पाच दिवस त्यांचा मुक्काम दिल्लीत राहणार आहे.
दिल्ली येथे राष्ट्रपती भवन पाहणार असून, राष्ट्रपतींच्या भेटीचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालय, प्रधानमंत्री संग्रहालय, लोटस मंदिर, अक्षरधाम मंदिर, लाल किल्ला, आग्रा येथे ताजमहल या पर्यटन स्थळांना भेट देणार आहेत. २६ मार्च रोजी सर्व विद्यार्थी विमानाने नागपूरमार्गे यवतमाळ येथे परत येणार आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत आठ शिक्षक आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न महादीप परीक्षेमुळे प्रत्यक्षात साकारले आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने २५ लाखांची आर्थिक तरतूद केली. या निधीतून सहलीचा नियोजन, परीक्षा, पुस्तके आदी सर्व खर्च केला. यवतमाळ जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यात पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.
घाटंजी अव्वल
जिल्हा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्या महादीप परीक्षेत सलग चौथ्या वर्षी घाटंजी तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या परीक्षेत घाटंजी तालुक्यातील सर्वाधिक १५ विद्यार्थी विमानवारीला पात्र ठरले. तर द्वितीय स्थान उमरखेड तालुक्याला मिळाले. येथून नऊ विद्यार्थी पात्र झाले. यासोबतच यवतमाळ, नेर प्रत्येकी सहा, महागाव पाच, राळेगाव, वणी, मारेगाव, दारव्हा, बाभूळगाव तालुक्यातून प्रत्येकी दोन तर कळंब तालुक्यातून एक असे ५२ विद्यार्थी विमानवारीस पात्र ठरले.