नागपूर : जपानी, जर्मन अशा विविध विदेशी भाषा बोलणाऱ्या नरखेड तालुक्यातील थूगाव (निपाणी) शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एक अनोखा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. आपल्या नवकल्पनांनी ही शाळा राज्यातच नव्हे तर देशपातळीवर प्रसिद्ध आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही या शाळेतील विद्यार्थ्यांचे आकर्षण आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनासाठी केलेला उपक्रम काय आहे पाहूया.
जिल्हा परिषद शाळेतील अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे अपेक्षित लक्ष देता येत नाही. परिणामी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होतो, अशी नेहमीची तक्रार असते. मात्र, केवळ चार शिक्षकांच्या उपलब्धतेतही विद्यार्थ्यांना स्वयं-अध्ययनासाठी प्रवृत्त करून त्यांच्या गतीनुसार शिकण्याची संधी दिल्यास काहीही साध्य करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थूगाव निपाणी. या शाळेने विविध स्पर्धांमध्ये सातत्याने अव्वल स्थान मिळवले असून आता विद्यार्थ्यांनी पुस्तकातील एका प्रकरणामधुन तब्बल २५० पेक्षा अधिक प्रश्न तयार करण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
शाळेत उपक्रमशील शिक्षक असतील तर ती नावारूपास येते. पण जेव्हा विद्यार्थीच उपक्रमशील असतात, तेव्हा शाळा आपले वेगळेपण सिद्ध करते. याचे प्रत्यंतर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या अभिनव उपक्रमातून दिसून येते. शिक्षक संदीप बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरी व चौथीतील विद्यार्थी एका प्रकरणातील प्रत्येक वाक्यावर सरासरी दोन-तीन प्रश्न तयार करून अक्षरशः त्या प्रकरणाची चाळणी करतात. यामध्ये केवळ प्रश्ननिर्मिती होत नाही, तर त्यांची उत्तरेही विद्यार्थी स्वतः लिहून काढतात. विविध पद्धतींनी प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्ननिर्मिती कौशल्य विकसित होते आणि वाचन क्षमता सुधारते. इयत्ता तिसरीतील नक्ष लकडे, मंथन राऊत, अमेय क्षीरसागर, तनिष्का डिग्रसे, कनिष्का भोयर, उज्ज्वल आगरकर, दर्शना वंजारी या विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा अधिक प्रश्न तयार केले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली असून अभ्यासातील रस वाढला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकांचाही सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
गुणवत्ता विकास उपक्रमाचा सकारात्मक प्रभाव
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा आणि उपक्रमशीलता अनुभवता आली. उपक्रमशील शिक्षक आणि तितकेच उत्साही विद्यार्थी एकत्र आल्यास जिल्हा परिषद शाळांचे सोन्याचे दिवस नक्कीच येतील. महेंद्रकुमार भगत, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, नरखेड