लोकसत्ता टीम
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ३० जूनच्या उत्तररात्री झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील नागपूर येथील झोया (गुडिया) शेख हिच्यावर आज दुपारी मलकापूर राज्यमार्गावरील मुस्लीम कब्रस्थानात मुस्लीम रितीरिवाजाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
झोयाचे दोन तीन नातेवाईक येथे आल्याने व जळून कोळसा झालेल्या मृतदेहाची स्थिती बिकट असल्याने बुलढाण्यातच दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुलढाण्यातील समाजबांधवांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. त्यानंतर आज हा विधी पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह समाजातील नागरिक बहुसंख्येने हजर होते.
आणखी वाचा-नागपूर : समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात, दोघे अत्यवस्थ
मृत झोया हिचे नातेवाईक काल शनिवारी रात्री उशिरा बुलढाण्यात दाखल झाले. त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहातील मृतदेहाची पाहणी केली. तोपावेतो काही नातेवाईकांनी सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय मान्य केला. मात्र, तिचे नातेवाईक व स्थानीय समाजबांधवांनी दफनविधीवर जोर दिला. रात्री व आज सकाळी दहा वाजेपर्यंत हा तिढा कायम होता.