अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : वडिलांचे आजारपणात निधन झाल्याने घरात मोठय़ा असलेल्या जोया ऊर्फ गुडिया शेख (२४, नरसाळा रोड, दिघोरी) हिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. दोन भाऊ आणि आजारी आईच्या जबाबदारीचे ओझे जोयाच्या खांद्यावर पडले. ती अगदी कमी वयात कमवायला लागली. घराची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी ‘ईव्हेंट’च्या कामासाठी मैत्रिणीसह पुण्याला निघाली. मात्र, ‘समृद्धी’वरील बस अपघातात तिचा मृत्यू झाला. 

जोया ऊर्फ गुडिया शेख ही दहावीत असताना वडील जमालुद्दीन शेख यांचा आजारपणात मृत्यू झाला. उपचारासाठी अनेकांकडून कर्ज घेतल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली. त्यात नेहमी आजारी राहणारी आई आणि लहान भाऊ अझरुद्दीन आणि जाकीर यांची जबाबदारी तिच्यावर आली. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरही तिला आर्थिक परिस्थितीमुळे अकरावीत प्रवेश घेता आला नाही. अशावेळी नातेवाईकांनीही पाठ फिरवली. शेवटी जोयाने कुणापुढे हात पसरण्याऐवजी स्वत: शिक्षणाचा त्याग करुन कामाला घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> Buldhana Accident : सामूहिक अंत्यसंस्कारला विलंब, काय आहे कारण?

कपडय़ाच्या दुकानात किंवा कॅटिरगमध्ये काम करीत जोयाने कुटुंबीयांना उपाशी राहू दिले नाही. मात्र, एकटीच्या कमाईवर भागत नसल्यामुळे तिच्या एका भावाला शिक्षण सोडावे लागले. जोया ही एका ‘इव्हेंट’ कंपनीसोबत करारबद्ध झाली आणि कंपनीच्या कामानिमित्त पुणे, मुंबई, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहारसह अन्य राज्यात जायला लागली.  तीच घरातील किराणा आणायची, वीजबील आणि घरभाडे  द्यायची. घरातील तीनही सदस्यांचा जोयाच आधार होती. तो आधारच कुटुंबीयांनी आज कायमचा गमावला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : हे काय! नागाने रंग बदलला; अर्धा पांढरा आणि…, VIDEO व्हायरल

ईद शेवटचीच ठरली

उत्तरप्रदेशात इव्हेंटचे काम आटोपून ईदसाठी जोया नागपुरात आली होती. भावंडासह तिने ईद साजरी केली.  पैसे संपल्यामुळे तिने लगबगीने कामावर परतण्याची तयारी केली. मात्र, आईने ईदीच्या दुसऱ्या दिवशी नातेवाईकाकडे भेटीला जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, कंपनीचे पुण्यातून फोन येत असल्याने तिचा नाईलाज झाला आणि ती शुक्रवारीच पुण्यासाठी खासगी बसने निघाली.

घराचे स्वप्नही अपूर्णच

घरभाडे देण्यास पैसे नसल्यामुळे घरमालकाने अनेकदा आईचा अपमान केला. त्यामुळे जोयाने भविष्यात स्वत:चे घर घेण्याचा मानस आईकडे व्यक्त केला होता. स्वत:च्या घरात भाऊ आणि आईला सन्मानाने नेण्याची तिची इच्छा होती. मात्र, जोयाचे स्वप्न अपूर्णच राहिल्याची खंत तिच्या आईने व्यक्त केली.