वाशिम : राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने तारीख वाढवून देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवेतून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहायक, मुख्य सेविका, पशू धन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी यासह विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
हेही वाचा – ऑगस्ट महिनाअखेरीस अवकाशात दोन मोठ्या खगोलीय घटना
हेही वाचा – गदर यांच्यावरील काव्यसंमेलन थांबवले! पूर्वपरवानगी न घेतल्याने पोलिसांचा आक्षेप
सदर परीक्षेच्या सुरवातीपासूनच परीक्षा शुल्क अवाढव्य असल्याने राज्य भरातील विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच विविध संघटना, नेत्यांनी सरकारविरोधात भाष्य केले होते. त्यामुळे परीक्षा शुल्क कमी होण्याची विद्यार्थ्यांना आशा होती. मात्र कुठलेही परीक्षा शुल्क कमी न झाल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. मात्र अनेक वेळा सर्व्हर डाऊन होत असल्याने रात्री उशिरापर्यंत अनेक नेट कॅफे, मोबाईल व मिळेल त्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. त्यातच आज शेवटचा दिवस असून ऑनलाईन सर्व्हर नीट चालत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उमेदवार करत आहे.