मालेगाव : येथून पाच किलोमीटर अंतरावरील दाभाडीतही करोनाचा शिरकाव झाला आहे. तेथे आठ रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागही हादरला आहे. करोनाला रोखण्यासाठी दाभाडीने १४ दिवसांसाठी उत्स्फूर्तपणे संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. शहर आणि तालुका भागातील करोना बाधितांची संख्या ३४३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून २८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
दोन दिवसापूर्वी दाभाडी येथील डॉक्टर बाधित असल्याचे आढळून आले होते. त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य निकट संपर्क आलेल्या ६७ व्यक्तींच्या स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील सात जण बाधित असल्याचे उघड झाले. त्यात त्याच्या कुटुंबातील सहा जण आणि बांधकामाच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या एका गवंडय़ाचा समावेश आहे. याशिवाय नाशिक येथील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील चिंचगव्हाण येथील चार आणि झोडगे येथील दोन जणांचेही नमुने तपासण्यात आले. या सहाही जणांचे अहवाल नकारात्मक आले. नयापुरा भागातील ७० वर्षांचा वृध्द बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.