शहर पोलीस महिला सुरक्षा कक्षाकडे तक्रारी

नाशिक : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. नाते अधिकाधिक घट्ट होण्यासाठी देण्यात येणारा वेळ हा समाज माध्यमांसाठी वापरला जात आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या संशय, वाद, मारहाण आदी कारणांमुळे शहर पोलिसांच्या महिला सुरक्षा कक्षात वर्षभरात ९६० तक्रारी प्राप्त झाल्या. महिला सुरक्षा कक्षाच्या प्रयत्नांतून १४६ जोडप्यांनी पुन्हा घरचा रस्ता धरला असला तरी तक्रारीचा वाढता ओघ चिंताजनक आहे.

सध्या एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ नाही ही सबब सांगत बऱ्याचदा समाज माध्यमातून व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात राहत आहेत. आभासी दुनियेत रममाण होत असताना त्याचा अप्रत्यक्ष परिणाम नातेसंबंधावर होत असून यामुळे अनेक संसार मोडकळीस आल्याचे चित्र शहर परिसरात आहे. पती किंवा पत्नी जास्तीत जास्त वेळ हा भ्रमणध्वनीवर घालवते या एकमेव कारणाला पुढे करत दोघांमध्ये होणारा वाद, कोणाच्या संपर्कात..कोण होता..काय बोलताय, आदी प्रश्नांना कंटाळूत महिलांनी सुरक्षा कक्षाची पायरी ओलांडत नांदण्यास नकार दिला. पतीकडून सातत्याने घेण्यात येणारा संशय, नात्यावर होणारा विपरीत परिणाम, सातत्याने होणारी मारहाण, पतीचे व्यसन, कुटुंबातील अन्य व्यक्तींचा घरात असणारा हस्तक्षेप आदी कारणेही काही जणींकडून पुढे करण्यात आली असल्याचे महिला सुरक्षा कक्षाच्या संगीता निकम यांनी सांगितले. कक्षाकडे महिलेने तक्रार केल्यानंतर तिच्यासह नातेवाईकांचे तसेच पतीचे समुपदेशन केले जाते. महिलेची नेमकी तक्रार काय, तिला पुढे संसार करायचा की नाही, फारकत का घ्यायची, या सर्व प्रश्नांची तटस्थपणे उत्तरे शोधण्यास सांगितले जाते. आपल्याच तक्रारीकडे आपण त्रयस्थपणे पाहत असल्याने याचा सकारात्मक परिणाम जाणवतो. कक्षातील अधिकारी-कर्मचारी यांच्या समुपदेशनामुळे १४६ दाम्पत्यांनी पुन्हा संसाराची वाट धरली. तर २५९ महिलांनी न्यायालयात तडजोड करीत सामंजस्याने फारकत घेतली.

कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी वाढत असून विवाहबाह्य़ संबंध, व्यसन ही कारणेही आहेत. या वेगवेगळ्या कारणांतून हिंसा वाढत असल्याने कक्षाकडे २९१ महिलांनी कायदेशीर कारवाईची मागणी केल्याने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व तक्रारींचा निपटारा करताना महिलांना कायद्याचे ज्ञान आहे. मात्र ते अपुऱ्या स्वरूपात असल्याने त्या कायद्याचा दुरुपयोग करतात, असे काही प्रकरणांच्या बाबतीत घडत आहे. अशा महिलांचे समुपदेश करणे जिकिरीचे ठरते.  कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत आहेत.

डिसेंबरअखेरीस  शहर पोलिसांच्या महिला सुरक्षा कक्षाकडे ९६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पैकी ८१९ तक्रारी लिखित स्वरूपात आहेत.

 -संगीता निकम (पोलीस, महिला सुरक्षा कक्ष)