जिल्ह्य़ात नव्याने पाच रुग्ण

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना बजरंगवाडीतील गर्भवतीचा मृत्यू झाला. करोनामुळे शहरात हा पहिला मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू

झाला. मृत्यूनंतर तिचा अहवाल सकारात्मक आल्याने आरोग्य विभागही सावध झाला आहे. मंगळवारी प्राप्त अहवालात नाशिकसह सटाणा, सिन्नर, येवला आणि मालेगाव येथील प्रत्येकी एक असे पाच जणांचे अहवाल सकारात्मक आले.

सकाळी महापालिका क्षेत्रातील एकूण प्राप्त अहवालात ८० पैकी पाच अहवाल सकारात्मक, तर ७५ जणांचे अहवाल नकारात्मक आले. मालेगावमध्ये १४ अहवाल प्राप्त झाले. त्यात १३ नकारात्मक, तर नयापुरा भागातील ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ३८३ वर पोहचली आहे. यामध्ये मालेगावमध्ये ३३२, तर नाशिक शहरात १८ आणि ग्रामीण भागातील २७ रुग्णांचा समावेश आहे. मालेगावच्या तुलनेत नाशिकमध्ये फारशी चिंताजनक स्थिती नसल्याचे चित्र आता बदलू लागले आहे.

बजरंगवाडी येथील २० वर्षांच्या महिलेचा अहवाल सकारात्मक आला. महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण केले जात असताना ही महिला आढळली होती. मूळची उत्तर प्रदेश येथील महिला पतीसमवेत नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते.

तिची प्रकृती गंभीर असल्याने पथकाने तिला प्रथम आडगावच्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. पण, महिला दाखल झाली नव्हती. प्रकृती खालावल्यानंतर २ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली. नंतर अवघ्या दोन तासांत तिचा मृत्यू झाला. या महिलेची करोना चाचणी करण्यात आली होती. या महिलेच्या संपर्कात कोण आले याचा शोध घेतला जात आहे.

Story img Loader