दिवसाढवळय़ा खून, दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनांची जाळपोळ अशा घटनांत वाढ
वाहनांची जाळपोळ, खून, टवाळखोरांचा खुलेआम धुडगूस, दागिने खेचून नेणे.. आदी असंख्य घटनांची मालिका अव्याहतपणे सुरू असल्याने नाशिक शहराची वाटचाल पुन्हा एकदा बिहारच्या दिशेने वेगाने होत असल्याचे अधोरेखीत होत आहे. काही वर्षांपूर्वी यांसारख्या घटनांमुळे ‘गुन्हेगारांचे शहर’ अशी नाशिकची ओळख बनली होती. मध्यंतरीच्या काळात थंडावलेल्या गुन्हेगारी घटनांनी गेल्या काही महिन्यांत पुन्हा डोके वर काढल्याने त्याची पुनरावृत्ती होत आहे. या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने ही विचित्र स्थिती निर्माण झाल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. खून वा प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील राजकीय गुंड पोलिसांना महिनोंमहिने सापडत नसल्याचे विदारक चित्र आहे. सद्यस्थितीतील घडामोडी लक्षात घेतल्यास नाशिकमध्ये पोलिसांचे राज्य आहे की गुन्हेगारांचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
प्रभावी कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांची हिंमत दिवसागणिक वाढत चालल्याचे दृष्टिपथास पडत आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस कधीकधी मध्यस्ताची भूमिका निभावतात. काही महिन्यांपूर्वी काटय़ा मारुती पोलीस चौकीत ही भूमिका कर्मचाऱ्यांच्या अंगाशी आली होती. पंचवटीतील दोन गटांतील हाणामारीच्या चौकशीसाठी बोलावलेल्या एका गटातील युवकावर दुसऱ्या गटाने थेट पोलिसांसमोर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना घडली होती. गेल्या आठवडय़ात डीजीपीनगर भागात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सलग दोनवेळा वाहन जळीतकांड घडले. त्यात एकूण १२ दुचाकी वाहने भस्मसात झाल्या. इमारतींचे नुकसान झाले. वाहन जाळपोळीच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. टोळक्यांचा धुडगूस आटोक्यात आलेला नाही. सिडको परिसरात एका टोळक्याने दिवसाढवळ्या एकाचा खून व दुसऱ्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना त्याचे निदर्शक ठरली. इंदिरानगर वसाहतीत काही दिवसांपूर्वी काळे-दांडेकर आणि गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली. मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात धुडगूस घातला. खूनाचे कित्येक प्रकार घडले. त्याची मालिका अगदी रविवापर्यंत कायम राहिली.
सोन साखळी चोरटय़ांचा उच्छाद तर शहराच्या पाचवीला पुजलेला. त्यात बनावट पोलिसांची भर पडली. गाडीला धक्का लागल्याचे निमित्त करून लुटमार केली जाते. पायी जाणाऱ्या महिलांचे दागिने खुलेआम खेचून नेले जातात. बनावट पोलीस असल्याचे सांगून वृध्दांची लुबाडणूक होते. कित्येक वर्षांपासून चाललेल्या या घटनांवर आजतागायत पोलिसांना तोडगा सापडलेला नाही. या घटनाक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एखादी गंभीर घटना घडली की, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन स्थितीची पाहणी करतात. नागरिक दैनंदिन भेडसावणाऱ्या व्यथा मांडतात. काही उपायही योजले जातात. पुढील घटनेवेळी केवळ ठिकाण बदलते आणि गुन्ह्याचे स्वरुप. गुन्हेगारांचे दहशत माजवण्याचे प्रयत्न तसेच कायम राहतात. गुन्हेगारी घटनांचा उंचावणारा आलेख नाशिकची ओळख बदलण्यास हातभार लावत आहे. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात राजकीय पदाधिकारी गुन्हेगारांच्या बचावासाठी खुलेआम पुढे येत असल्याच्या काही घटना घडल्या होत्या. एखाद्या प्रकरणात संशयिताला पोलिसांसमोर अथवा न्यायालयात कधी व कसे हजर करायचे याचे नियोजन बाहुबली राजकीय पदाधिकारी करायचे. त्यावेळी नाशिक हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. तेव्हा घडणाऱ्या घटना आणि सध्याची स्थिती यामध्ये फारसे अंतर नसल्याने नागरिक धास्तावले आहेत.

राजकीय गुन्हेगार गायब कसे ?
राजाश्रयामुळे उदयास आलेल्या अनेक गुन्हेगारी टोळ्या शहरात कार्यरत आहेत. याच टोळ्यांतील खून व दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यातील राजकीय छत्रछायेखाली वावरणारे गुन्हेगार कित्येक महिन्यांपासून पोलिसांना सापडत नाही. सराईत गुन्हेगारांच्या दुहेरी खून प्रकरणी अटकपूर्व जामीन घेत बोहल्यावर चढून भूषण लोंढे अंतर्धान पावला. भारतनगरच्या दंगल प्रकरणी अनेक दिवस गायब राहिलेल्या आकाश साबळेला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडले. ३१ डिसेंबरच्या रात्री सातपूर पोलीस ठाण्यालगत जगताप वाडीत पीएल ग्रुपच्या कार्यालयात दोन सराईत गुन्हेगारांची हत्या झाली होती. संबंधितांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जव्हार फाटा येथे फेकण्यात आले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे याच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी भूषण लोंढेने लग्नासाठी उच्च न्यायालयाकडून तात्पुरत्या स्वरुपात जामीन मिळवला. लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर तो जो गायब झाला तो आजपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. फरार असलेला भूषण हा रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे. त्याचा शोध पोलीस घेऊ शकलेले नाहीत. भारतनगर येथे घडलेल्या दंगलीतील राष्ट्रवादीचा नगरसेवक पुत्र आकाश साबळे याच्या बाबतीत वेगळे काही घडले नाही. कित्येक दिवसानंतर तो पोलिसांना सापडला. परंतु, भूषण लोंढेला यंत्रणा पकडू शकलेली नाही.

युवकाचा खून करून संशयितांची नागरिकांना धमकावणी
मागील भांडणाची कुरापत काढून संशयितांनी लाथा बुक्क्यांसह डोक्यावर विटा मारत स्वागत चंद्रकांत कन्सारा (३६) या युवकाचा खून करण्याची घटना रविवारी अशोक स्तंभालगतच्या मल्हार गेट पोलीस चौकीजवळ घडली. मारहाण केल्यानंतर संशयितांनी आसपासच्या नागरिकांना धमकावत पळ काढला.
गंभीर जखमी झालेल्या स्वागतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सनी पगारे (रा. राजवाडा) आणि रोहित सापटे (पंचवटी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. हे दोन्ही संशयित गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असून यापूर्वी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
स्वागत कन्साराला मल्हार गेट पोलीस चौकीलगत संशयितांनी बेदम मारहाण केली. दगड विटांनी ठेचून काढले. या हल्ल्यानंतर स्थानिकांना या घटनेची माहिती कोणी पोलिसांना दिल्यास तुमचेही तसेच हाल होतील अशी धमकी संशयितांनी दिली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.