पोलिसांकडून कारवाईचा बडगा

नाशिक : शहर परिसरात टाळेबंदी लागू असतानाही विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. यामध्ये सामाजिक अंतराचे भान न ठेवता, तोंडाला मास्क न लावता अनेक जण फिरत आहेत. अशा टवाळखोरांसह मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टाळेबंदी असली तरी अत्यावश्यक सेवा म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडता येत असल्याने याचा काही मंडळी गैरफायदा घेत आहेत. अतिशय फुटकळ कारणे देत रस्त्यावर गर्दी करून सामाजिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून ९३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मास्क वापरणे बंधनकारक असतानाही काही मंडळी तोंडाला मास्क न लावता फिरत आहे. घराबाहेर पडतांना ज्यांनी मास्कचा वापर केला नाही, अशा ८५३ जणांविरुद्ध आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करीत १९ लाख ८९ हजार रुपये दंड करण्यात आला. त्यापैकी तीन लाख ८१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, करोना संसर्ग वाढत असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना सामाजिक अंतराचे भान ठेवावे, तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader