मालेगावात करोना बळींची संख्या आठ

मालेगाव :  १३ एप्रिल रोजी करोनामुळे मयत झालेल्या येथील पवार गल्लीतील महिलेचे पाच नातेवाईक करोनाबाधित असल्याचे आढळून आले. रविवारी या पाच जणांसह अन्य तिघांचे तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने मालेगावातील करोनाबाधितांची

संख्या ८५ वर पोहोचली आहे. तसेच सोमवारी आणखी दोन जण दगावल्याने करोनामुळे शहरात मरण पावलेल्यांची संख्या आता आठ झाली आहे.

पवार गल्ल्तील ५२ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी करोना तपासणीचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाला होता. त्याची तत्काळ दखल घेऊन आरोग्य यंत्रणेने मयत महिलेचे नातेवाईक आणि निकट संपर्कात आलेल्या अन्य लोकांचे अलगीकरण करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी प्राप्त झालेल्या ३८ अहवालांपैकी आठ अहवाल सकारात्मक असून ३० नकारात्मक आले आहेत. या आठ अहवालांमध्ये येथील संगमेश्वर भागातील मोतीबाग नाका, जाधव नगर, संजय गांधीनगर येथे वास्तव्यास असलेले मयत महिलेच्या पाच नातेवाईकांचा समावेश आहे. याशिवाय इस्लामपुरा, हजार खोली आणि नयापुरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कुंभारवाडा भागातील एका ५४ वर्षांच्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. दुपारी जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या मुस्लीम नगरमधील ५५ वर्षांच्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. या दोघांचा करोना तपासणीचा अहवाल सकारात्मक होता. त्यांच्या मृत्यूमुळे करोना बळींची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, संपूर्णपणे बंदिस्त केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. प्रारंभी केवळ आठ क्षेत्रात करोनाचे रुग्ण आढळून आले होते.

हळूहळू या क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून येत असल्याने प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता आठवरून १८ वर पोहचली आहे. यामध्ये शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधी नगर, जाधव नगर, मोमीनपुरा, दातारनगर, जुना आझादनगर, जुना इस्लामपुरा,भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आरोग्य यंत्रणेद्वारे रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच या परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा परिसर निर्जंतुक केला जात असून प्रतिबंधित क्षेत्रात १४ दिवस नागरिकांना घरातच थांबावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवावगळता तेथे कुणासही संचार करता येणार नाही. याबाबतच्या सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त किशोर बोर्ड आणि उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.