शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीही भाजीपाला, दूध व तत्सम पुरवठा बंद राहिल्याचा परिणाम आता शहरातील खाद्यगृहे, भोजनालये, हॉटेल व्यवसायावर जाणवत असून पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहिल्यास शहर व ग्रामीण भागातील सर्वच खाद्यगृहे बंद करण्याशिवाय गत्यंतर राहणार नसल्याचे चित्र आहे. बाहेरगावहून होणाऱ्या दूधपुरवठय़ात घट झाल्यामुळे नेहमीपेक्षा कमी दुधावर गरज भागवावी लागत आहे. त्याची झळ ज्युस सेंटर व चहाच्या टपरीधारकांनाही बसली.

भाजीपालाटंचाईचा फटका खाद्यगृह, स्नॅक्स सेंटर, हॉटेल खानावळ अशा सर्वच व्यवसायाला बसला आहे. शेतकरी संपाच्या पाश्र्वभूमीवर, व्यावसायिकांनी दोन-तीन दिवस पुरेल इतका साठा केला होता. भाजीपाला नाशिवंत माल असल्याने तो फ्रिजमध्ये साठवावा लागतो. त्यामुळे त्यास मर्यादा येतात. आहे तो शिल्लक माल संपण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी काही व्यावसायिकांनी बाजार समितीत भाजीपाला मिळेल काय याचा शोध घेतला; परंतु तिथे भाजीपाल्याची एकही गाडी आली नाही. बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होता. आदल्या दिवशी किरकोळ विक्रेत्यांची विक्री किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली होती.

यामुळे संबंधितांसह घाऊक माल खरेदी करणारे व्यापारीही बाजार समितीकडे फिरकले नाही. शहरात कुठेही भाजीपाला उपलब्ध नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कृषिमाल वाहतुकीस वाहनधारक तयार नाहीत. या सर्वाचा परिणाम जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. एक-दोन दिवसात संपावर तोडगा न निघाल्यास हॉटेल, चायनिज व स्नॅक्स सेंटर बंद करावे लागणार असल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे.

दुधाचा तुटवडा भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. एरवी बाहेरगावहून हजारो लिटर दूध दररोज शहरात येते. ही वाहतूक जवळपास बंद असल्याने स्थानिक पातळीवर उपलब्ध दुधावर काम सुरू आहे. मंगळवारी भद्रकाली व शहरातील इतर भागात दूध विक्री सुरू होती. आसपासच्या गावांमधून मोठय़ा प्रमाणात दूध शहरात येते. तुटवडय़ामुळे दुधाच्या दरात कमालीची वाढ झाली. रतीबाने जे घटक दूध घेतात, त्यांच्या दैनंदिन पुरवठय़ात कपात झाली आहे. ज्यूस सेंटर, हॉटेल या ठिकाणी नियमित जितका दुधाचा पुरवठा केला जायचा, त्यात निम्म्याने घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

अशीच स्थिती चहा विक्रेत्यांची झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात शेकडोंच्या संख्येने चहाच्या टपऱ्या आहेत. संबंधितांना प्रत्येकी पाच ते २० लिटपर्यंत दूध लागते. या व्यावसायिकांना दूध महागडय़ा दराने मिळत असल्याने चहा-कॉफीच्या किंमतीत वाढ करणे अपरिहार्य ठरल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. स्नॅक्स व चायनीज सेंटरची संख्या मोठी आहे. चायनिज पदार्थामध्ये भाज्या हा महत्त्वाचा घटक असतो.

सक्तीची सुटी घ्यावी लागणार

संप सुरू होण्याआधी दोन दिवस पुरेल इतका भाजीपाला भरून ठेवला होता. शुक्रवारच्या दिवसाची गरज त्यावर कशीबशी भागविली जाईल. परंतु, शनिवारी भाजीपाला उपलब्ध न झाल्यास सक्तीची सुटी घ्यावी लागेल. चायनीज पदार्थासाठी भाजीपाला मोठय़ा प्रमाणात लागतो. तोच मिळत नसल्याने व्यवसाय कसा करणार? दूधही आवश्यक तेवढे उपलब्ध होत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

विजय साखरे, श्री समर्थ ज्युस व स्नॅक्स सेंटर

हॉटेल व्यवसाय अडचणीत

भाजीपाला, कांदा व बटाटे मिळेनासे झाले असल्याने आणखी दोन दिवस ही स्थिती कायम राहिल्यास व्यावसायिकांना हॉटेल बंद करावे लागतील. बाजारात कृषिमाल येत नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. कारण, हॉटेल व्यवसाय बंद झाल्यास शासकीय महसुलातही घट होईल. शहरात काही तारांकीत हॉटेल आहेत. त्या ठिकाणी परदेशी नागरिक वास्तव्यास येतात. भाजीपाला पुरवठा न झाल्यास त्यांना स्थानिक पातळीवर काय अडचण आहे हे व्यवस्थापन कसे सांगणार. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळायला हवा. त्यासाठी शासनाने प्रत्येक मालास हमीभाव निश्चित करून द्यावेत.

संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक हॉटेल असोसिएशन