प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी, २६० रुग्णांवर उपचार सुरु
नाशिक : प्रारंभीचा बराच काळ शहरात नियंत्रणात राहिलेला करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वेगवेगळ्या भागात होऊ लागला आहे. पुन्हा चार नवे रुग्ण सापडल्याने शहरातील करोनाबाधितांची संख्या १३८ वर पोहचली आहे. यातील ४४ जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. मालेगाव शहरासह ग्रामीण भागातील करोनाचे रुग्ण वाढत आहे. सध्या नाशिकमध्ये ८६, मालेगावमध्ये १०७ तर ग्रामीण भागात ५७ आणि जिल्ह्य़ाबाहेरील १० असे एकूण २६० रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी यंत्रणांना यात यश येत नसल्याचे चित्र आहे.
गुरूवारी सकाळी प्राप्त झालेल्या ४० अहवालापैकी नांदगाव येथील ५६ वर्षांच्या महिलेचा अहवाल सकारात्मक आला. उर्वरित ३९ अहवाल नकारात्मक आले. आदल्या दिवशी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा चार नव्या रुग्णांची भर पडली. सहा दिवसात नाशिक शहरातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सर्दी पडशाचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी आलेल्या चार जणांचे अहवाल सकारात्मक आले. यामध्ये वडाळा येथील आयटी पार्क येथील रहिवासी, रासबिहारी हायस्कूलजवळील ४७ वर्षांची महिला, वडाळा येथील महिला, पंचवटीतील दिंडोरी नाका परिसरातील ७० वर्षांंचा पुरूष यांचा समावेश आहे. सध्या शहरातील ८६ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टाळेबंदी शिथील झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली. शारीरिक अंतराच्या निकषाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब करोनाचा प्रसार होण्यास हातभार लावणारी असल्याची भीती व्यक्त होत आहे.
नव्याने रुग्ण आढळलेले बलरामनगर येथील श्याम प्राईड अपार्टमेंट, नाशिकरोडच्या दत्तमंदिर येथील रघुपती सोसायटी आणि वडाळा रस्त्यावरील व्हिनस अपार्टमेंट हे तीन क्षेत्र नव्याने प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आले. तर नवश्या गणपती लगतच्या रचना अॅस्ट्रेरिया इमारतीचे निर्बंध हटविण्यात आले आहेत.
नाशिकप्रमाणे मालेगावसह ग्रामीण भागातील रुग्णांचा आलेखही उंचावत आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाचे १०५९ रुग्ण आढळले. त्यातील ६० जणांचा मृत्यू झाला. ७३९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. मालेगाव महापालिका क्षेत्रात सध्या १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात ५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये चांदवडचे दोन, निफाडचे सात, नांदगाव नऊ, येवला आठ, सटाणा सहा, इगतपुरी एक आणि मालेगाव ग्रामीणच्या सात जणांचा समावेश आहे.