प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र दुकाने मर्यादित संख्येत सुरु, अनेक वस्तू खरेदी करण्याची मुभा

नाशिक : टाळेबंदीमुळे प्रदीर्घ काळ अनेक वस्तूंची खरेदी करू न शकलेल्या नागरिकांना बुधवारपासून काही अंशी खरेदीची संधी मिळणार आहे. महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागातील एकल दुकाने आणि जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकानेदेखील मर्यादित संख्येत उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. या ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाही, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क परिधान करणे अशा नियमांचे ग्राहक, व्यापाऱ्यांना पालन करावे लागणार आहे. करोनाच्या सावटामुळे ठप्प झालेल्या व्यवसायाचे चक्र हळूहळू का होईना फिरू लागणार आहे. मालेगाव शहरासाठी मात्र ही सवलत नाही.

करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने केंद्र सरकारने लाल, केशरी आणि हिरव्या क्षेत्रासाठी वेगळी नियमावली देऊन टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत वाढविली आहे. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी टाळेबंदी आवश्यक असली तरी तिचा कालावधी वाढत चालल्याने नागरिकांमधील अस्वस्थता वाढत आहे. मार्चच्या अखेरीस जिल्ह्य़ात जीवनावश्यक वस्तूची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी, व्यावसायिक दुकानांवर निर्बंध घालण्यात आले. किराणा, औषध, भाजीपाला, दूध अशा निकडीच्या वस्तू वगळता उर्वरित सर्वच दुकाने बंद असल्याने गरज असूनही अनेकांना अनेक बाबींची खरेदी करता येत नव्हती.

संचारबंदी, जमावबंदी लागू असल्याने अत्यावश्यक निकड वगळता अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. उपरोक्त निकष आजही लागू असले तरी नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पावले टाकली आहेत. या अंतर्गत बुधवारपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागांत दैनंदिन व्यवहार मर्यादित स्वरूपात सुरू केले जातील. महापालिका क्षेत्रात ११, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५५, मालेगाव ग्रामीण, नांदगाव, येवला, नाशिक ग्रामीण, निफाड या तालुक्यांत प्रत्येकी एक तर चांदवडमध्ये दोन आणि सिन्नरमध्ये तीन प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या क्षेत्रात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, औषध, भाजीपाला खरेदी करता येईल याची व्यवस्था आधीच केलेली आहे. जिल्ह्य़ातील नऊ तालुके केशरी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या भागातील बाजारपेठा अटी, शर्तीवर मर्यादित संख्येने सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.

बुधवारपासून शहर आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता दैनंदिन व्यवहार पूर्ववत होण्यास हातभार लागणार आहे. जीवनावश्यक वगळता इतर कोणतीही एकल दुकाने आणि एकाच परिसरातील सर्वच प्रकारची पाच दुकाने उघडता येतील. सराफी पेढय़ा, कापड, मिठाई वा तत्सम कोणताही निकष त्यासाठी राहणार नाही. टाळेबंदीच्या काळात अनेक सणोत्सव पार पडले. इच्छा असूनही करोनाच्या धास्तीमुळे ग्राहकांना निकडीच्या वस्तूंची खरेदी करता आली नाही. व्यवसाय थंडावल्याने विक्रेते, दुकानदार चिंतेत होते. शहर, ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य दुकाने मर्यादित संख्येने का होईना उघडण्यास हिरवा कंदील मिळाल्याने सामान्यांना दिलासा मिळणार आहे.

मर्यादित संख्येने अटी, शर्तीवर दुकाने उघडण्यास परवानगी दिली गेली असली तरी नियमांचे पालन न झाल्यास, नव्याने प्रतिबंधित क्षेत्र निर्माण झाल्यास या सवलती लगेचच रद्द होतील, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. या सवलतीचा लाभ रिक्षा, बस सेवा, केस कर्तनालये, व्यायामशाळा आदींना मिळणार नाही. मॉल, बहुमजली व्यापारी संकुलातील जीवनावश्यक वस्तू, औषध दुकान वगळता इतर दुकानांना ही सवलत मिळणार नाही.