विक्रेत्यांना हमीपत्र द्यावे लागणार
नाशिक : ग्राहकांची गर्दी, गोंधळ, खुंटीवर टांगले गेलेले नियम यामुळे अवघ्या काही तासांत बंद करावी लागलेली शहरातील मद्यविक्री शिस्तबद्धपणे पुन्हा होण्याचे संकेत मिळत आहेत. विक्रेत्यांना टाळेबंदीच्या नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र सादर करावे लागेल. गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक, ग्राहकांची मास्क तपासणी, सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकण्यात येईल. शांततेत नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देता येईल, असे खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटल्याने प्रशासनाने बंद केलेली मद्य दुकाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.
शहरातील दुकाने लवकर उघडल्यास पहिल्या दिवशी गर्दी, गोंधळामुळे मद्य खरेदी करू न शकलेल्या ग्राहकांना नवी संधी मिळणार आहे. राज्य सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर सोमवारी सकाळपासून ग्राहकांनी दुकानांबाहेर ठाण मांडले होते. याबाबत प्रशासनाचे आदेश उशिरा आल्याने दुपापर्यंत बहुतांश दुकानांबाहेर भलीमोठी गर्दी उसळली होती. अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. सामाजिक अंतराच्या नियमाचा विसर पडला. या काळात ज्यांना संधी मिळाली, त्यांनी पुन्हा मिळेल की नाही या धास्तीने मुबलक खरेदी केली. खरेदीसाठी चाललेल्या चढाओढीने अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मद्य खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहर विभागातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला. परंतु, २४ तासांच्या आत ही बंदी मागे घेण्याचा विचार सुरू झाला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याविषयी भाष्य केले. कधीतरी मद्यविक्रीची दुकाने सुरू करावीच लागणार आहेत. टाळेबंदीच्या तत्त्वांचे पालन करण्याचे हमीपत्र देऊन विक्रेत्यांना दुकाने सुरू करता येतील. ग्राहकांनी एकाच वेळी खरेदीसाठी गर्दी करू नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास या दुकानांवर बंदीचे सावट कायम राहील, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे शहरात मद्यविक्री लवकरच सुरू होईल हे अधोरेखित झाले आहे.
मद्यविक्री दुकानांसमोरील गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना कसरत करावी लागली होती. याची जबाबदारी आता विक्रेत्यांवर टाकली जाईल. गर्दी होणार नाही म्हणून विक्रेत्यांना सुरक्षारक्षक नियुक्त करावे लागतील. शांततेत, शिस्तबद्धपणे मद्यविक्री व्हावी, यासाठी शासन, प्रशासकीय पातळीवर धडपड सुरू आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतरच मद्यविक्री सुरू केली जाईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
५७ मद्य विक्रेत्यांवर कारवाई
मद्यविक्री करताना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शहरातील ५७ मद्यविक्री दुकान चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्य विक्रेत्यांना परवानगी देताना दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक नको, सामाजिक अंतर राखण्याची अट घातली गेली होती. मद्य खरेदीसाठी मोठय़ा संख्येने ग्राहक जमले. विक्रीत मग्न असणाऱ्या विक्रेत्यांनी दुकानाबाहेरील गर्दीकडे दुर्लक्ष केले. अनेक ठिकाणी गोंधळ झाला. जमावबंदी, सामाजिक अंतराचे नियम याचे पालन झाले नाही. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनाक्रमाची दखल घेऊन ५७ मद्य विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी सांगितले. नाशिक परिमंडळात २९, तर नाशिक परिमंडळ दोनमध्ये एकूण २८ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.