प्रमुख बाजारपेठांमध्ये संभ्रमाचे चित्र; एकल, कॉलनी परिसरात मर्यादित दुकानांना परवानगी
नाशिक : प्रशासनाने व्यापारी संकुल, मॉल वा तत्सम स्वरुपाची सरसकट दुकाने उघडता येणार नसल्याचे स्पष्ट करूनही बुधवारी मेनरोड, दहीपूल, शालिमार, महात्मा गांधी रस्त्यासह इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एकल दुकाने आणि कॉलनी परिसरातील दूर अंतरावरील दुकाने मर्यादित संख्येत सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि, सरसकट सर्वच दुकाने उघडण्याचा संभ्रम निर्माण झाला आणि व्यापारी, व्यावसायिकांना प्रतिबंध घालतांना पोलिसांची दमछाक झाली. एकिकडे दुकान बंद केली जात असतांना कानडे मारुती लेन, कॉलेजरोड, गंगापूर रोड, पवननगर, पंचवटी अशा अनेक भागात मात्र काही दुकाने उघडलेली होती. दुसरीकडे प्रदीर्घ काळ घरात थांबलेल्या नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागातील एकल दुकाने आणि जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकाने मर्यादित संख्येत उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. व्यापारी संकुले, मॉल अशा बहुमजली इमारतीतील दुकाने सरसकट उघडण्यास प्रतिबंध आहे. कॉलनी परिसरात दूर अंतरावरील एकल दुकाने तसेच परस्परांपासून दूर असणारी पाच दुकाने उघडण्यास मुभा दिली गेली. प्रशासनाच्या आदेशाचा व्यापारी वर्गाने आपल्या सोईने अर्थ काढला. सरसकट दुकाने खुली करण्यास परवानगी मिळाल्याचा समज करून घेत अनेक व्यापारी आपापली दुकाने उघडण्यास बाहेर पडले. मेनरोड, दहीपूल, शालिमार, महात्मा गांधी रस्ता या मध्यवर्ती बाजारपेठेत दुकानांबाहेर व्यापारी जमल्याचे पाहायला मिळाले. महापालिका, पोलिसांची पथके स्थितीवर नजर ठेऊन होती. त्यांनी सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या मुद्यावरून दावे-प्रतिदावे झाले.
दुकाने उघडल्यास दंड ठोठावला जाईल, असा इशारा देण्यात आला. यामुळे आपण दुकान उघडले नसल्याचे मेनरोडवरील विक्रेते संतोष गायकवाड यांनी सांगितले. करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुकान उघडायचे की नाही, याबद्दल विक्रेत्यांमध्ये चर्चा झाली. परवानगी नसल्याने आपण दुकान न उघडता घरी परतल्याचे कविता पगारे यांनी सांगितले. मेनरोड, दहीपूल आणि आसपासची दुकाने पोलीस, महापालिकेने उघडू दिली नाही. परंतु, येथून जवळच असणाऱ्या कानडे मारूती लेनमध्ये अनेक दुकाने नेहमीप्रमाणे सुरू झाली.
ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली होती. गंगापूर रोड, पंचवटी, कॉलेजरोड, आदी भागातील प्रमुख मार्गावरील भ्रमणध्वनी, मिठाई, कपडे, कटलरी, होजिअरी, हार्डवेअर अशी काही दुकाने उघडण्यात आली.
एका भागातील दुकाने सक्तीने बंद केली जातात, तर दुसरीकडे ती खुलेआम सुरू असतात याबद्दल व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. व्यापारी संकुलातील इलेक्ट्रॉनिक्स वा तत्सम दुकाने उघडल्याप्रकरणी काही दुकानदारांना कारवाईचा इशारा देण्यात आला. व्यवसाय चक्र हळुवारपणे गतिमान करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवशी गोंधळाचा ठरला.
कॉलनी परिसरातील अन्य दुकाने सुरू झाल्यामुळे सामान्यांना काही अंशी का होईना खरेदी करता आली. ज्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांना पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाही, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क परिधान करणे अशा नियमांचे ग्राहक, व्यापाऱ्यांना पालन करावे लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रांना अशी कोणतीही सवलत दिली गेलेली नाही. शहरात उडालेल्या गोंधळावर जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण देत पोलिसांनी दुकाने बंद करण्याची केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही सवलत नाही. लाल आणि केशरी क्षेत्रात व्यापारी संकुल, मॉल, वर्दळीच्या भागात सरळ रांगेतील दुकाने उघडण्यास प्रतिबंध आहे. एकल दुकान, निवासी वस्ती परिसरातील दोन-चार दुकाने उघडण्यास परवानगी आहे. मेनरोडसारख्या मध्यवर्ती बाजारपेठेतील सरळ रांगेतील दुकाने एकल क्षेत्रात येत नाहीत.
– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी)
सराफ बाजार बंद राहणार
नाशिक सराफ असोसिएशन आणि पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा झाली. सभासद, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन संघटनेने १७ मेपर्यंत सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सराफी बांधवांनी आपले दुकाने बंद ठेवावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी केले आहे.