नियंत्रणासाठी सौम्य लाठीमार, काही तासांतच विक्री बंद
नाशिक : ऐन उन्हाळ्यात प्रदीर्घ काळ मद्य टंचाईचे चटके सहन करणाऱ्या मद्य ग्राहकांनी भल्या सकाळपासून खरेदीसाठी दुकानांबाहेर ठाण मांडले. लांबच लांब रांगा लावल्या. दुपारी जेव्हां दुकाने उघडली, तेव्हां गर्दी इतकी वाढली की जमावाला नियंत्रित करणेही अवघड ठरले. तुफान गर्दीमुळे जमावबंदी, सामाजिक अंतराचे नियम खुंटीला टांगले गेले. या काळात ज्यांना संधी मिळाली, त्यांनी वारेमाप मद्य खरेदी केली. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे काही ठिकाणी जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अनेक दुकाने बंद करण्यात आली. मद्याची तहान भागविण्यास आलेल्या काही मद्य ग्राहकांना काठीचा प्रसाद खाऊन पळ काढावा लागला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रदीर्घ काळापासून बंद असणारी मद्य विक्री खुली करण्याचा पहिला दिवस पोलीस यंत्रणेची परीक्षा पाहणारा ठरला. संचारबंदी, टाळेबंदीसह तपासणी नाके आदींची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांच्या कामांच्या यादीत मद्य विक्री दुकानांबाहेर गर्दी नियंत्रणाची नवी जबाबदारी येऊन पडली. शासन निर्णयाची रात्रीच माहिती मिळाल्याने मद्यप्रेमींनी सकाळी उठल्यानंतर थेट जवळचे मद्य दुकान शोधण्यास प्राधान्य दिले. नाशिक शहर लाल क्षेत्रात असल्याने मद्य दुकाने उघडतील की नाही, याबद्दल साशंकता होती. जिल्हा प्रशासनाची अधिसूचना आल्यानंतर नियमांचे पालन करून मद्य विक्री होईल ही अपेक्षा फोल ठरली. दुकाने उघडण्याआधीच शहरातील बहुतांश मद्य दुकानांबाहेर मद्यग्राहकांची झुंबड उडाली. सामाजिक अंतर, जमावबंदी असा कोणताही नियम दुकानांबाहेर लागू नसल्याचे चित्र दिसले.
प्रशासनाने शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागातील किरकोळ मद्यविक्रीची दुकाने खुली करण्यास मान्यता दिली. या दुकानांसमोर पाचपेक्षा अधिक ग्राहक असता कामा नये असा दंडक घातला. नोकरांसह कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनिंग, सर्दी-खोकला-ताप असणाऱ्यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध, टाळेबंदीची मार्गदर्शक तत्वे पालनाचे बंधन टाकण्यात आले. या आदेशाची मद्य ग्राहकांसह मद्य विक्रेते प्रतीक्षा करत होते.
मद्य खरेदीसाठी इतका जमाव जमला की त्यांचे नियंत्रण अवघड ठरू लागले. सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवला गेला. पोलिसांनी आवाहन करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस पोलिसांना एन.डी. पटेल रोड आणि म्हसरूळ भागात जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. गंगापूर रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, सातपूर, जेलरोड या भागात वेगळी स्थिती नव्हती. प्रचंड गर्दी जमल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत ती दुकाने बंद केली. अवघ्या एक ते दीड तासात मद्य विक्री थांबली. अनेकांना खरेदी करता आली नाही. नियमांचे पालन न करणाऱ्या मद्य विक्रेत्यांविरुध्द कारवाई केली जाणार आहे.
टाळेबंदीचे नियम खुंटीवर
मद्य विक्री सुरू होण्याआधी शेकडोंचे जथ्थे दुकानांबाहेर जमले होते. दूपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. दुकाने उघडल्यानंतर खरेदीसाठी चढाओढ सुरू झाली. गोंधळही उडाला. टाळेबंदीच्या नियमांचा अक्षरश: बोजवारा उडाला. काहींनी जमेल तितके मद्य खरेदी करण्याचा सपाटा लावला. दुकानांमधून पेटय़ा घेऊन ग्राहक आनंदी चेहऱ्याने बाहेर पडत होते. गोंधळामुळे अनेक दुकाने बंद करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. अनेकांना खरेदीची संधी मिळाली नाही. मद्य घ्यायला आलो अन् काठीचा प्रसाद मिळाला, अशी त्यांची भावना होती.