नाशिक : टाळेबंदीची मुदत १७ मे पर्यंत वाढविण्यात आली असली तरी राज्य सरकारने काही नियमांमध्ये शिथीलता आणली आहे. परिणामी नाशिक शहर परिसरात खरेदीसाठी नाशिककर मोठय़ा प्रमाणात बाहेर पडल्याने टाळेबंदीच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र शहर परिसरात सोमवारी दिसले. शहरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याने नागरिकांना आल्या पावली परतावे लागले.

एकल दुकाने सुरू राहणार अशी माहिती मिळाल्याने नागरिकांनी जीवनावश्यक सामानासह अन्य काही वस्तु खरेदी करण्यासाठी सोमवारी बाहेर पडण्यास सुरूवात केली. पोलिसांकडूनही बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची विचारणा न झाल्याने टाळेबंदी संपली की काय, असे चित्र शहरातील मुख्य चौकांसह बाजारपेठेत दिसले.

शहरात सातहून अधिक भाग प्रतिबंधित असतांना मिळेल त्या रस्त्याने वाहनचालक मुख्य रस्त्यांवर येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. शहरातील रविवार कारंजा, मुंबई नाका, कॉलेज रोडसह अन्य भाग वाहनचालकांसह पादचाऱ्यांमुळे गजबजला.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील किराणा सामानासह किरकोळ भुसार मालाचे दुकाने वगळता कपडे, भ्रमणध्वनी, इलेक्टिकल वस्तु आदी दुकाने बंद राहिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशाविषयी संभ्रम असल्याने सायंकाळपर्यंत रस्त्यावरील गर्दी कायम राहिली. यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचा फज्जा उडाला.

काही हौशी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. भ्रमणध्वनी दुरूस्ती, विक्रीची दुकाने  बंद असली तरी काही दुकाने अर्धवट उघडे ठेवत काम सुरू होते.

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे गस्तीवरील पथक सक्रिय राहिले. परंतु, पोलीस कारवाईला न घाबरता नागरिकांची वाहनावरून तसेच पायी आगेकूच सुरू राहिली. या गर्दीत स्थलांतरीत मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे नाशिकरोड रेल्वे स्थानक, पेठ रोड, मुंबई-आग्रा महामार्गच्या दिशेने पायी चालत राहिले. काहींनी झाडांच्या सावलीत विश्रांती घेतली. तर काही चालत राहिले. काहींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गर्दी केली.

 

 

Story img Loader