घरी परतण्याची व्यवस्था
नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे पंजाब येथील लव्हली विद्यापीठात अडकलेल्या महाराष्ट्रातील १२० विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मंगळवारी नाशिक येथे आणण्यात आले. या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी सामाजिक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
टाळेबंदीमुळे पंजाबच्या लव्हली विद्यापीठात महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकले होते. वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन यासह पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मदतीने पंजाबमधून आडगांव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटीत मंगळवारी पहाटे १२० विद्यार्थ्यांना आणण्यात आले. नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहात त्यांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी अल्पोपाहार देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना सहा बसद्वारे महाराष्ट्रातील त्यांच्या गावी पाठविण्यात आले.
या सर्व गाडय़ांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासात जेवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व गाडय़ा संपूर्णपणे निर्जंतुक करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गावी पाठविण्यात आले. या वेळी माजी आमदार पंकज भुजबळ, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ, संचालक दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, अंबादास खैरे, चिन्मय गाढे आदी उपस्थित होते.
ज्या गोष्टींना कधी सामोरे जाण्याची वेळ आली नव्हती, ती वेळ आज आपल्यावर आली असून या संकटावर एकमेकांच्या मदतीने आपण मात करू शकतो, असा विश्वास जिल्हाधिकारी मांढरे यांनी या वेळी व्यक्त केला. दरम्यान, सहा मे रोजी उर्वरित विद्यार्थी दोन बसव्दारे नाशिक येथे पोहचणार असून त्यांनाही त्यांच्या घरी पोहचविण्यात येणार आहे.
पंजाबच्या लव्हली विद्यापीठात शिक्षण घेणारे आम्ही सर्व विद्यार्थी दीड महिन्यांपासून अडकलो होतो. टाळेबंदी वाढल्याने आमच्या समोर घरी कसे परतणार, याचे आव्हान होते. राष्ट्रवादीचे पंजाबमधील पदाधिकारी तसेच छगन भुजबळ आणि प्रशासनाच्या वतीने आमची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आम्हाला भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून आपआपल्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वाचे आभारी आहोत. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे आम्ही नक्कीच पालन करू.
– निकिता शुक्ल (अंध विद्यार्थिनी)