घाऊक बाजारात कांदादरात चढ-उतार सुरू असताना किरकोळ बाजारात भाववाढ कायम आहे. सध्या किरकोळ बाजारात कांद्याने ६० रुपयांचा टप्पा पार केला असून, दिवाळीपर्यंत कांदादर वाढलेलेच राहतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील किरकोळ बाजारांत नाशिक, ओतूर, पुणे आणि लासलगाव येथून कांद्याची आवक होते. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज कांद्याच्या १२० गाडय़ा येतात. सध्या तिथे कांद्याच्या ९८ गाडय़ाच येत आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज २५ गाडय़ांतून कांद्याची आवक होते. सध्या केवळ १४ गाडय़ाच येत आहेत, असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी भगवान देशमुख यांनी सांगितले.

आठवडय़ाभरात कांद्याच्या दरात घाऊक बाजारात सात रुपयांनी तर किरकोळ बाजारात १० रुपयांनी वाढ झाली. आठवडय़ापूर्वी कांद्याचा घाऊक बाजारातील दर ३५ रुपये किलो, किरकोळ बाजारातील दर ५० रुपये होता. सध्या कांद्याचा घाऊक बाजारात दर ४२ रुपये असून किरकोळ बाजारात तो ६० रुपये किलोने विकला जात आहे. दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात येईल. तोपर्यंत साठविलेल्या उन्हाळ कांद्यावर भिस्त राहणार असल्याने दिवाळीपर्यंत कांदादर चढेच राहणार असल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

काही दिवसांत दर कमी होतील : कृषिमंत्री

’देशभरात कांदादरात वाढ झाली असली तरी नाफेडसारख्या संस्थांकडून पुरवठा वाढविण्यात आल्याने काही दिवसांत दरघसरण होईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी दिली.

’कांद्याची दरवाढ झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची सरकारला कल्पना आहे. ’शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताचा समतोल साधून परिस्थितीतून मार्ग काढला जाईल, असे तोमर म्हणाले.

शेतकऱ्यांचे आंदोलन

नगर जिल्ह्य़ात घाऊक बाजारात कांद्याचे दर मंगळवारी प्रति क्विंटल सातशे ते एक हजार रुपयांनी कोसळले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावर तीन तास रास्तारोको आंदोलन केले. दक्षिणेकडील राज्यांतील बाजारांत मंगळवारी तेथील उत्पादकांच्या कांद्याची मोठी आवक झाली. याचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याची मागणी ओसरण्यात झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. मंगळवारी लासलगाव बाजारात आठ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास किमान १२५२, तर कमाल ४२८० आणि सरासरी ३६५१ रुपये दर मिळाला.