बाजारपेठांमधील गर्दीमुळे संक्रमणाचा धोका, रुग्णसंख्या १२९ वर

नाशिक : शहरातील पखाल रस्त्यावरील ७३ वर्षांच्या वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर गेली आहे. शहरातील रुग्णांचा आलेख पाच दिवसांत झपाटय़ाने उंचावून १२९ वर पोहोचल्याने चिंता वाढली आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठांमध्ये गर्दी कमालीची वाढली आहे. नियमांचे पालन केले जात नसल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे. नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने, आस्थापनांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा महापौरांनी दिला आहे.

मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नाशिक शहरात स्थिती नियंत्रणात होती. परंतु काही दिवसांनी चित्र बदलले. चार, पाच दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. यात बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक असली तरी करोनाचा हा प्रसार काळजी वाढविणारा ठरला आहे. चार, पाच दिवसांत पंचवटी भागात रुग्णांची संख्या अधिक वाढली. २४ तासांत १३ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. चंपानगरी येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले.

क्रांतीनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील २५ वर्षांचा युवक, आगरटाकळी येथील रुग्णाच्या संपर्कातील पंचवटीच्या हनुमाननगर येथील २७ वर्षांचा युवक, महालक्ष्मी चित्रपटगृह परिसरातील रुग्णाच्या कुटुंबातील १३ वर्षांचा मुलगा आणि ३६ वर्षांची महिला तसेच २५ वर्षांचा युवक करोनाबाधित झाला आहे. याशिवाय पंडितनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील ६५ वर्षांची महिला, वडाळा गावातील ५९ वर्षांची व्यक्ती, श्रीरामनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील ६४ वर्षांची व्यक्ती यांचे अहवाल सकारात्मक आले. पोलीस मुख्यालयात वास्तव्यास असणारा ३६ वर्षांच्या ग्रामीण पोलिसाचा अहवाल सकारात्मक आला.

रुग्णांच्या प्रमाणानुसार प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ होत आहे. करोना रुग्ण सापडल्याने बलरामनगर येथील साई विश्वास ही इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. करोनाबाधित रुग्ण आढळल्याने संस्थात्मक अलगीकरण केंद्र म्हणून जाहीर झालेल्या कासलीवाल रुग्णालयाचे संस्थात्मक अलगीकरणाचे निर्बंध हटविण्यात आले. काठेगल्लीतील श्रीहरी अपार्टमेंटच्या प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी पूर्ण झाल्याने हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २५ इतकी आहे.

दुकाने, आस्थापना बंदीचा इशारा

शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पिठाची गिरणी आणि इतर आस्थापना खुल्या करण्यास परवानगी देताना अनावश्यक गर्दी होणार नाही, दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल आणि नियमानुसार विक्री आणि सेवा दिली जाईल असे बंधन घालण्यात आले होते. तथापि, याकडे दुर्लक्ष करत मुख्य बाजारपेठांसह सर्वत्र ग्राहकांची कमालीची गर्दी होत आहे. टाळेबंदी केवळ नावापुरतीच शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जी दुकाने, आस्थापना सामाजिक अंतर, सुरक्षिततेच्या उपाययोजना करत नाहीत त्यांच्यावर तातडीने बंदीची कारवाई केली जाईल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे. करोनाचा प्रसार वाढत असताना बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. अनेक दुकानांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही. टाळेबंदी काही अंशी शिथिल झाल्यानंतर गर्दीचे प्रमाण अधिकच वाढले आहे.

Story img Loader