भाजप महिला आघाडीचा मेळावा उधळण्याच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चाललेल्या संघर्षांत शुक्रवारी सेनेच्या मंत्र्यांनी उडी घेत शिवसैनिकांवर दरोडय़ासारखा गुन्हा दाखल करण्यामागे मुख्यमंत्री आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप केला. राज्य शासनावरील जनतेचा विश्वास उडत चालला असून भाजपला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही सेना नेत्यांनी शुक्रवारी दिला.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडय़ाबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आणि शिवसैनिकांनी मंगळवारी भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात धुडगूस घालत तो उधळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणात भाजप आमदारांच्या मागणीमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या पाश्र्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख आ. अजय चौधरी यांनी शुक्रवारी नाशिकरोड कारागृहात जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली.
गृहमंत्री व पालकमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून भाजपच्या कुटील कारस्थानास शिवसेना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. संपर्क नेते अजय चौधरी यांनी भाजपवर अतिशय जहरी भाषेत टीकास्त्र सोडले. सेना नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राजकीय आंदोलनात लावलेले दरोडय़ाचे कलम रद्द करण्याची मागणी केली.