राज्यातील शेतकरी आंदोलनासंदर्भात सातत्याने तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घणाघाती शब्दांत टीका केली. ते शनिवारी नाशिकच्या येवला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा खरपूस समाचार घेतला. शेतकरी आंदोलनाबाबतची शिवसेनेची सातत्याने बदलणारी भूमिका पाहता त्यांनी राज्यभरातील फलकांवर आता वाघाऐवजी सरड्याचे चित्र लावावे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. शिवसेनेने फलकांवर रंग बदलणाऱ्या ‘शॅमेलिओन सरडा’ हे चिन्ह वापरावे, असे शेतकरी बोलू लागले आहेत. शेतकरी प्रश्‍नावर मंत्री मंडळाच्या बैठकीवर सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि मुख्यमंत्र्यांना विचारुन बहिष्कार टाकला, म्हणजे बहिष्कार टाकण्यासाठी परवानगी लागते काय? हा नौटंकीचा कळस आहे. उद्धव साहेब परदेशात आहेत आणि मंत्री खिशात राजीनामे ठेवून केवळ राजीनामे देणार म्हणून धमकावत आहेत.  हे खिशातील राजीनामे पावसात भिजतील एवढी चेष्टा सोशल मीडियावर आता होऊ लागली आहे. सत्तेत राहायचे, फायदा घ्यायचा , विरोधही करायचा आणि सतत सरड्यासारखा रंग बदलायचा ही नौटंकी सेनेने थांबवावी, असे मुंडे यांनी म्हटले.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला. यशस्वी आंदोलनाने सरकार हादरले. सरकारला प्रश्‍न सोडवता येत नसल्याने शेतकरी आंदोलनात शासनाने फूट पाडली.  शेतकर्‍यांचे आंदोलन बदनाम करण्याची एकही संधी भाजपा सरकारने सोडलेली नाही.  राष्ट्रवादीच्या आमदारांचाच कर्जमाफीत फायदा होणार आहे, अशी बदनामी करण्याचे षडयंत्र भाजपाच्या माहिती तंत्रज्ञानाच्या शाखेने राबविले. भाजपकडून अल्पभूधारक आणि बहुभुधारक यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

…तर बच्चू कडू यांना पुण्यात फिरू देणार नाही: भाजप

गेल्या तीन वर्षात दुष्काळामुळे राज्यातील शेती पिकलीच नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सातबारा कोरा करु, सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्‍वासन सत्ताधारी भाजपने वचननाम्यात दिले असताना सत्तेवर आल्यावर याच पक्षाने या वचननाम्याला बगल दिली आहे. सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेणे शक्य असताना एप्रिल महिन्यापासुन अभ्यासाच्या नावाखाली दोन महिने काढले तरीही यांचा अभ्यास कसा झाला नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कर्जाच्या ओझ्याखाली ग्रासलेला शेतकरी दुष्काळाने हैराण झाला आहे.  गेल्यावर्षी पीक आले, पण भाव नाही म्हणून पुन्हा कर्जाचा डोंगर झाल्यामुळे राज्यातील त्रस्त झालेला शेतकरी आत्महत्या करीत आहे.   पिंपरी येथील तरुण शेतकर्‍याने कर्जामुळे आपले जीवन संपवले.  मुख्यमंत्री आल्याशिवाय ‘मला जाळू नका’ अशी चिठ्ठी लिहून शेतकर्‍याने आत्महत्या केली तरीही शासनाला दया आली नाही.  शेतकर्‍याला कर्ज देताना अभ्यासाची गरजच काय आहे? भाजप सत्तेवर आल्यावर १७ हजार व्यापार्‍यांसाठी ३५ हजार कोटी रुपयाची एलबीटी रद्द केली परंतु दीड कोटी शेतकर्‍यांसाठी अद्याप अभ्यासच चालु आहे, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

मंत्रिगटासोबतच्या चर्चेनंतरच शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरेल-सुकाणू समिती

राज्यातील समुळ शेतकरी नष्ट करण्याचे षडयंत्रच भाजपाने हातात घेतले आहे. आता चर्चा नको, अभ्यासगट नको, सरसकट कर्जमाफी करुन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशी जोरदार मागणीही मुंडे यांनी यावेळी केली.  शेतकरी संपाच्या आंदोलनात येवल्याच्या शेतकर्‍यांनी भाग घेतला त्यातील ४४ शेतकर्‍यांवर दरोडा आणि खुनाचे गुन्हे दाखल हे करतात. तसेच पोलीसही त्यांच्यावर अत्याचार करतात याचा अधिवेशनात सरकारला जाब विचारुन उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी भाग पाडु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शासनाने शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.  नुकसान समाजकंटकांनी केले असेल त्यांच्यावर जरुर कारवाई करा. परंतु शेतकर्‍यांवर ३०७ चा गुन्हा दाखल करतात, हा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. याचा जाब मुख्यमंत्र्यांनाही देण्यास भाग पाडू, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.

छगन भुजबळ असते तर…
आज छगन भुजबळ असते तर शेतकर्‍यांवर झालेली अन्यायाची परिस्थिती नक्कीच टळली असती, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. आमदार छगन भुजबळ यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे या पत्रकांराच्या प्रश्‍नावर  बोलतांना मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे भुजबळांचे मागे उभी आहे.  काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाही.  आमच्या मर्यादा समजुन घ्याव्यात असेही ते म्हणाले.