तुडुंब भरलेले महाकवी कालिदास कलामंदीर..सर्वाना निकालाची प्रतिक्षा..अन् एकेक निकाल जाहीर होऊ लागताच समर्थकांकडून होणारा टाळ्या, शिट्टय़ांचा पाऊस..पारितोषिक स्वीकारण्यासाठी रंगमंचावर जाणाऱ्यांची न्यारी धावपळ..अशा या उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात अव्वल ठरलेल्या ‘व्हॉटस अॅप’ ची घोषणा होताच या एकांकिकेच्या कलाकारांनी आणि उपस्थितांनी विजयाच्या घोषणा देत अक्षरश: कलामंदीर डोक्यावर घेतले.

‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नाशिक विभागीय अंतीम फेरी सोमवारी पार पडली. स्पर्धेतील अंतीम घटीकेचे हे शब्दचित्र. कलाकारांचे उत्स्फुर्त सादरीकरण.. त्यास संगीत व प्रकाश योजनेची मिळालेली साथ.. अनोख्या प्रयोगांचा अंतर्भाव.. या सर्वांना प्रेक्षकांकडून मिळणारी दाद, अशा अभूतपूर्व वातावरणात के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्सअप’ने इतर पाच एकांकिकांना मागे सारत सवरेत्कृष्ट एकांकिकेचा प्रथम पुरस्कार मिळवत मुंबई येथे १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाअतीम फेरीत प्रवेश मिळवला. द्वितीय क्रमांकाची सवरेत्कृष्ट एकांकिका आरंभ महाविद्यालयाची ‘कोलाज्’ तर तृतीय क्रमांक न. ब. ठाकूर महाविद्यालयाची ‘द परफेक्ट ब्लेंड’ ठरली. स्पर्धेनंतर काही वेळातच पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. पाऊस कोसळत असताना नवरंगकर्मीचा कलाविष्कार पाहण्यासाठी शहर परिसरातील ज्येष्ठ रंगकर्मीसह महाविद्यालयीन युवावर्ग आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन झाल्यानंतर स्पर्धेला हं.प्रा.ठा. कला महाविद्यालयाच्या ‘जेनेक्स’ एकांकिकेने सुरूवात झाली. नव्या-जुन्या पिढीतील वैचारिक दरी, त्यातून निर्माण होणारे वाद-संवाद याकडे एकांकिकेतून लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे विविध माध्यमातून होणारे शोषण, सामाजिक प्रश्न यावर बिंदू देशमुख महाविद्यालयाच्या ‘कोलाज’ने भाष्य केले. न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाने करिअर की लग्न अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या आजच्या युवतींचे दोन मत प्रवाह ‘द परफेक्ट ब्लेंड’मधून मांडले. बदलत्या जीवन शैलीत आरामशीर जगत ध्येयापासून विचलीत झालेल्या, गोंधळलेल्या युवा वर्गाचे प्रतिबिंब क. का. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या ‘जाने भी दो यारो’ एकांकिकेत उमटले. तर, समाज माध्यमाचा विधायक वापर कसा होऊ शकतो, याकडे के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्स अॅप’मधून सुरेख मांडणी करण्यात आली.
लोकांकिका स्पर्धेला नाटय़प्रेमी व महाविद्यालयीन तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. अनील कदम, आ. राजाभाऊ वाजे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, यांसह इतर अनेक राजकीय मान्यवरांनी आवर्जुन हजेरी लावली. स्पर्धा नियोजनासह त्यातील गाळण्या, स्पर्धेचा दर्जा, सादरीकरण याबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयीन तरूणाईच्या कलागुणांना या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मत भुसे यांनी मांडले. नाशिकचा संघ महाअंतिम स्पर्धेत ठसा उमटवेल, असा विश्वासही त्यांच्यासह अनेकांनी व्यक्त केला. या फेरीसाठी परीक्षक म्हणून पुण्याचे ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जोगळेकर, नाशिकचे मुरलीधर खैरनार, अंशू सिंग यांनी काम पाहिले.
स्पर्धा झाल्यानंतर काही वेळात निकाल जाहीर करण्यात आले. निकालाच्यावेळी सर्वाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. ‘व्हॉट्स अॅप’चे नाव जाहीर झाल्यावर तरुणाईने सभागृह डोक्यावर घेतले. शिट्टय़ा, टाळ्या, डफ यांचा दणदणाट झाला. अन्य स्पर्धकांनी प्रतीस्पध्र्याचे अभिनंदन करीत आपल्यातील खऱ्या कलावंताची ओळख करून दिली. पारितोषिक वितरणास इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे वितरण विभागाचे सह महाव्यवस्थापक सुरेश बोडस, नाशिकचे वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे, जाहिरात विभागाचे जगदिश कर्जतकर व संपादकीय विभागाचे प्रमुख अविनाश पाटील, आदी उपस्थित होते.
दरम्यान, सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन ‘टॅलेण्ट पार्टनर’ तर स्टडी सर्कल ‘नॉलेज पार्टनर’ आहेत. स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले. रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर झी मराठी आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

’ जुन्या आठवणींना उजाळा
स्पर्धेत नवोदित कलाकारांचे सादरीकरण पाहता माझ्या महाविद्यालयीन दिवसांतील आठवणींना उजाळा मिळाला. त्यांचा जोश, सादरीकरणाची पध्दत पाहुन चांगले वाटले. नाशिकमध्ये कलावंत तयार होत आहे. ते नाट्य चळवळ पुढे नेतील, असा विश्वास एकांकिकेने दिला.
लोकेश शेवडे ( कुसुमाग्रज प्रतिष्ठान)
’ नव कौशल्य पुढे येत आहे
लोकसत्ता लोकांकिकेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता थक्क झालो. स्पर्धेच्या माध्यमातून नवे कलाकार पुढे येत असून जे नाटय़ चळवळ पुढे नेतील, अशी अपेक्षा आहे. केवळ बक्षीसाचा विचार न करता कलाकारांनी उत्तम सादरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र कलावंताना आपली कला सादर करतांना व्यत्यय येणार नाही, याची काळजी नाटय़ मंदिरानेही घ्यायला हवी. आजही कालिदासची रडगाणी कायम आहे याची खंत वाटते. मात्र तांत्रिक अडचणींचा बागुलबुवा न करता कलावंतानी आपले कौशल्य सिध्द केले हे महत्वाचे.
सदानंद जोशी (ज्येष्ठ रंगकमी, प्रेक्षक)
’ तांत्रिकदृष्टया लक्ष देणे गरजेचे
स्पर्धेत खुप छान एकांकिका सादर झाल्या. लोकसत्ताने नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विभागीय फेरीत केवळ पाच एकांकिका सादर झाल्या. ही संख्या जास्त असती तर स्पर्धेतील चुरस वाढली असती. कलावंतांनी काही तांत्रिक गोष्टींचा विचार तसेच अभ्यास करणे गरजेचे आहे.
सुरेश गायधनी ( प्रेक्षक)
’ तरूण वर्ग पुन्हा रंगभूमीकडे
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेला मिळालेला युवा वर्गाचा प्रतिसाद थक्क करण्यासारखा आहे. स्पर्धेमुळे आजच्या इंटरनेटच्या युगात नाटक, साहित्य यापासून दुर गेलेला युवा वर्ग पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळत आहे. एकांकिकेनिमित्त लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत विविध पातळीवर ही नवीन पिढी सक्रिय झाली हे कौतुकास्पद आहे. लोकसत्ताने त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ दिले. या माध्यमातून शहरात सशक्त नाटय़ चळवळ पुन्हा जोमाने उभी राहील असे चित्र समोर येत आहे.
जयप्रकाश जातेगांवकर (प्रेक्षक)

स्पर्धेच्या विषयांवर सर्वच फिदा, परीक्षकांकडून काही सल्ले..

प्रतिनिधी, नाशिक
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून नवरंगकर्मीच्या सृजनतेला वाव मिळत असला तरी रंगमंच खुप पुढे गेला आहे. काळानुरूप येथील सादरीकरणाची शैली बदलली आहे, वाचिक अभिनयासह देहबोलीला महत्व प्राप्त झाले आहे. नाटक हे प्रेक्षकांसाठी असते ही जाणीव कलावंतामध्ये भिनायला हवी, असे मत परीक्षकांसह काही मान्यवर प्रेक्षकांनी मांडले. दुसरीकडे विषयातील वैविध्य, सादरीकरणातील उत्स्फुर्तता, काही तरी वेगळे करून दाखविण्याची उर्मी लाजवाब होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. परीक्षकांसह प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..
खरच गरज आहे का ?
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला प्रेक्षकांचा मिळालेल्या प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. स्पर्धेतील विषय वेगळे असले तरी आपण काय सादरीकरण करत आहोत आणि कोणासाठी याची जाणीव कलावंतासह दिग्दर्शकांसह असणे गरजेचे आहे. प्रेक्षकांची उपस्थिती कलावंतासाठी महत्वाची असली तरी आपल्या इथे असण्यामुळे रंगमंचावर काम करणाऱ्यांना काही व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेणे प्रेक्षकांचे काम आहे. कोणाची मुले बागडताय, भ्रमणध्वनी वाजत आहे, कोणी मध्येच शिटय़ा वाजवते यामुळे परीक्षणात तसेच कलावंतासाठी हा व्यत्यय आहे. आपल्या कृतीमुळे कलावंताचा अपमान होतो. प्रत्येक वेळी खरच टाळ्या वाजवण्याची गरज आहे का? यामुळे वातावरण बिघडत तर नाही ना, याचा सारासार विचार प्रेक्षकांसह सर्वानी करावा.
दिलीप जोगळेकर (ज्येष्ठ रंगकर्मी, परीक्षक)
स्पर्धेत वैविध्य.. दर्जा वाढला..
स्पर्धा अतिशय उत्तम झाली. देशातील समस्यांची तरूण वर्गाला असलेली जाण पाहता गहिवरून आले. स्पर्धेतील विषय ताजे आणि युवकांच्या जगण्याशी संबंधित आहेत. विषयातील वैविध्यता, काम करण्यातला सहजपणा स्पर्धेची बलस्थाने म्हणता येतील. मात्र त्याच वेळी तंत्रज्ञानात फार काही बदल झाले असे म्हणता येणार नाही. विषयाची जाण ठेवत कलावंतानी केलेले सादरीकरण ही त्यात जमेची बाजू आहे.
मुरलीधर खैरनार (ज्येष्ठ रंगकर्मी, परीक्षक)

‘थिएटर’ हे व्यक्त होण्याचे माध्यम..
स्पर्धेतील विषयांचे वैविध्य, कलावंताचा जोश त्यांची उत्स्फुर्तता वाखाणण्याजोगी राहिली. स्पर्धेच्या माध्यमातून कलावंताची प्रयोगशीलता तपासली जात आहे. मात्र ‘थिएटर’ हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे कलावंताने विसरता कामा नये. अभिनयाचे कसब आजमावतांना आपला आवाज आणि देहबोलीकडे लक्ष देणे गरजचे आहे. त्याचवेळी लेखक आणि दिग्दर्शकाने संहितेकडे. संहितेतुन नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, काय सांगायचे हे सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता स्पर्धा एका विशिष्ट वळणावर आली असून तिचा दर्जा वाढला आहे.
अंशू सिंग (रंगकर्मी, परीक्षक)
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – व्हॉट्स अॅप (केटीएचएम महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – कोलाज् (आरंभ महिला महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – द परफेक्ट ब्लेंड (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अदील नूर शेख (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट लेखक – अदील नूर शेख (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- शर्वरी तळेकर (द परफेक्ट ब्लेंड)
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरूष)- सूरज बोढाई (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – सुषमा हसबनीस (कोलाज)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – अतुल शिरसाठ (व्हॉट्स अॅप)
सर्वोत्कृष्ट संगीत – तेजस बेलदार (कोलाज)