आंबेडकर चळवळीत जुन्या नेतृत्वावर तरुण पिढीचा विश्वास राहिलेला नाही. देशातील सध्याचे वातावरण आणि आंबेडकर चळवळीची सद्य:स्थिती पाहता खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता दलित समाजातील तरुण पिढीच्या हाती आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले.
येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या विषयावर आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात शुक्रवारी ‘दलितांचे राजकारण’ या विषयावरील परिसंवादात डांगळे बोलत होते. आजकाल सर्वच क्षेत्रांत होत असलेली विविध सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे पाहता प्रवाहापासून दूर गेलेल्या दलित समाजाला पुन्हा नव्या जोमाने पुढे आणण्याची नितांत गरज आहे.
या पाश्र्वभूमीवर आंबेडकर चळवळीचा नवा कार्यक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे. दलित पँथरच्या चळवळीचा जोम काळाच्या ओघात ओसरल्याने राजकीय शक्ती म्हणून अनुसूचित जातींची हानी झाली आहे. त्यापेक्षा सामाजिक शक्ती म्हणून दलित समाजासाठी मोठी हानी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या निर्मितीविषयी प्रा. डॉ. अनिल सपकाळ आणि डॉ. प्रदीप वाघमारे यांनी चर्चासत्रात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत घेतली. भारतातील प्रशासनिक, सामाजिक, आर्थिक सुधारणा विचारांची मूस घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशातच तयार केली होती.
परंतु त्यांची अंमलबजावणी भारतात केली. त्यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती करणे मोठे आव्हान होते. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासांच्या चित्रपटात रेखाटणे अवघड बाब होते. मात्र विविध पातळ्यांवर मिळालेल्या सहकार्यामुळे हा चित्रपट करता आला व त्याचा आपल्याला आनंद वाटत असल्याची भावना पटेल यांनी मांडली. पटेल यांनी या वेळी चित्रपटाविषयी अनेक प्रसंग कथन केले.
चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून भटक्या विमुक्तांच्या पदरी उपेक्षाच आल्याचा मुद्दा मांडला. अनुसूचित प्रवर्गात आजपर्यंत नोंद घेतली गेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर हा समाज सर्व सोयी-सवलतींपासून जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आरक्षणविषयक भूमिका आणि स्त्रियांच्या आरक्षणाचा प्रश्न’ या परिसंवादात प्रा. डॉ. अरुणा पेंडसे यांनी आज देशभरात महिलांवरील वाढता अन्याय, अत्याचाराच्या घटना पाहता स्त्रियांच्या रक्षणाच्या मुद्दा अतिशय गंभीर बनल्याचे नमूद केले.
याकरिता सामाजिक क्रांती घडविण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी स्त्रियांना आता राजकीय आणि सामाजिक सत्तेत वाटा मिळणे आवश्यक आहे. आज प्रत्यक्षात आंबेडकर असते तर तेही स्त्रियांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.