नाशिक: शहर परिसरातील अमली पदार्थांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखा कारवाई करत असून आतापर्यंत अमली पदार्थ खरेदी आणि विक्रीसंदर्भात १० गुन्हे दाखल असून कोटपा कायद्यातंर्गत ३५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड, इंदिरानगर परिसरात झालेल्या कारवाईत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या १० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच अमली पदार्थ सेवन करणाऱ्या पाच आणि शाळा, महाविद्यालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर कोटपा कायद्यातंर्गत ७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा… जळगावात महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना जाळ्यात

नाशिकरोड परिसरात सप्टेंबरपर्यंत झालेल्या कारवाईत ७१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अर्जुन पिवाल, सनी पगारे, सुमीत पगारे, मनोज गांगुर्डे आणि इतर तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. याच परिसरात ऑक्टोबरमध्ये झालेल्या कारवाईत अमली पदार्थांसह इतर साहित्य असा पाच कोटी, ९४ लाख, ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यात सात किलो चांदी जप्त करण्यात आली असून शिवा शिंदे, संजय काळे, समाधान कांबळे हे संशयित असल्याचे उघड झाले.

इंदिरानगर परिसरात अमली पदार्थांसह इतर साहित्य असा एक लाख, ८९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वसिम शेख, नसरिन उर्फ छोटी भाभी, इम्तीयाज उर्फ राजा शेख यांना अटक करण्यात आली. इतर संशयितांना शोधण्यासाठी सहा तपास पथके कार्यरत आहेत.

ललित पाटीलशी संबंधित महिलेकडून सात किलो चांदी जप्त

ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांनी त्यांच्या पुणे आणि महाड येथील अमली पदार्थ निर्मिती कारखान्यांवर छापा पडल्यानंतर शिंदे येथे अमली पदार्थ निर्मिती सुरु करुन पुणे, मुंबई या ठिकाणी विक्री चालु ठेवली होती. ललित पाटील हा पुण्यातून ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर नाशिक येथे एका महिलेकडे काही दिवस मुक्कामास होता. येथे काही आर्थिक व्यवहार झाले. पोलिसांनी संंबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडे पाच लाख, १२ हजार रुपयांची सात किलो चांदी मिळाली. ललित चांदी घेवून न जाता २५ लाख रुपये घेऊन गेल्याचे महिलेने सांगितले. सध्या संशयित महिलेला पुढील चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 cases related to buying and selling of drugs have been registered in nashik lalit patil drugs case dvr