नाशिक : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात शुक्रवारी सकाळी खासगी आराम बस आणि मालमोटार यांच्यात टक्कर होऊन त्यात १० ठार आणि ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. सर्व मृत ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील रहिवासी होते.
अंबरनाथ येथील लक्ष्मीनारायण प्रिंट्रिंग अॅण्ड पॅकेजिंग कंपनीतर्फे दरवर्षी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची देवदर्शन सहल काढण्यात येते. याहीवेळी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय १५ बस आणि तीन मोटारींमधून शिर्डीला निघाले होते. त्यांच्या गाडय़ा गुरुवारी रात्री ११.३० वाजता अंबरनाथहून शिर्डीकडे रवाना झाल्या होत्या. त्यातील एका भरधाव बसची समोरून येणाऱ्या वेगवान मालमोटारीशी टक्कर झाली. शुक्रवारी सकाळी ६ वाजता सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारातील ईशान्येश्वर मंदिराच्या कमानीजवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, त्यात बसची एक बाजू पूर्णत: कापली गेली, तर मालमोटारीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. या दुर्घटनेत बसमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींना सिन्नरमधील तीन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस कल्याण येथील गाइड ट्रॅव्हल कंपनीची आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अपघातप्रकरणी बस आणि मालमोटार चालकांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मृतांची नावे
दीक्षा गोंधळी (१८, कल्याण), प्रमिला गोंधळी (४५, अंबरनाथ), श्रावणी भारस्कर (३५), श्रद्धा भारस्कर (नऊ), नरेश उबाळे (३८) आणि वैशाली उबाळे (३२, अंबरनाथ), चांदनी गच्छे, बालाजी महंती (२८), अंशुमन महंती (सात) आणि रोशनी वाडेकर (३६)
काय घडले?
’बसच्या अतिवेगामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रवास सुरू झाल्यापासून चालक बस वेगाने चालवत होता.
’काही प्रवाशांनी त्याला वेग कमी करण्याची सूचनाही केली होती, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
’पहाटे सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना चालकाने पुन्हा बस भरधाव चालविल्याने हा अपघात झाल्याचे बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले.
’अपघातात बालाजी महंती या बसचालकाचाही मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना अपघात नेमका कशामुळे झाला, त्याची चौकशी करावी, असे आदेश शिंदे यांनी दिले.