लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील किमान १५ टक्के वाहने ही इलेक्ट्रिकवरील राहतील, असा निर्णय झाला असल्याने नाशिक विभागाच्या ताफ्यात नव्याने १० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या बस सिन्नर, शिर्डी, त्र्यंबक रस्त्यावर धावणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात १४ ई बस प्राप्त झाल्या. या बस नाशिक-बोरिवली, नाशिक-सप्तश्रृंग गड, नाशिक- त्र्यंबक आणि नाशिक- शिर्डी या मार्गावर धावत आहेत. बुधवारपासून या ताफ्यात १० नव्या ई बस दाखल झाल्या. बुधवारपासून सकाळी पाच ते रात्री १० या वेळेत बस धावणार आहेत. या बस नाशिक-सिन्नर, नाशिक – शिर्डी, नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर धावणार आहेत.

आणखी वाचा-खड्डेमय रस्त्यांमुळे नाशिकमध्ये अपघातांचा धोका

इलेक्ट्रिक बसव्दारे पर्यावरणपूरक सेवा दिली जात असून पाच ते १० वर्षापर्यंतच्या मुलांना अर्ध तिकीट राहणार आहे. तसेच या बससेवेत महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती तसेच अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त खेळाडू, आजी-माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजनेतंर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी पर्यावरणपूरक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 new electric buses introduced in nashik division mrj