लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: सरकारी खरेदीत घेतलेला कांदा देशांतर्गत घाऊक बाजारात विकला जात असल्याने व्यापार करणे अवघड झाल्याची तक्रार करत बुधवारपासून जिल्ह्यातील एक हजारहून अधिक व्यापारी पुन्हा एकदा लिलावातून बाहेर पडले. यामुळे लासलगाव, पिंपळगाव या मुख्य बाजार समित्यांसह सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले. अनेक बाजार समित्यांच्या आवारात शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे देशांतर्गत कांदा पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. त्यामुळे लिलाव पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात वा नवीन परवाने देऊन कांदा खरेदीची पर्यायी व्यवस्था उभारण्याची सूचना बाजार समित्यांना केली आहे.

व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचे आधीच जाहीर केले असल्याने बुधवारी शेतकरी कांदा घेऊन बाजारात आले नाहीत. गेल्या महिन्यात ४० टक्के निर्यात कर लागू झाल्यानंतर सलग तीन दिवस लिलाव बंद होते. त्याची पुनरावृत्ती होत आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे जिल्ह्यात एक हजारहून अधिक सदस्य आहेत. हे सर्व जण लिलावापासून दूर झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले. सरकार व्यापारात उतरल्याने कांदा व्यापार परवडत नाही. त्यामुळे लिलावातून तुर्तास बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नव्हते, असे कारण संघटनेकडन पुढे करण्यात आले आहे.

आणखी वाचा-भाजप जिल्हा ग्रामीणची अवाढव्य कार्यकारिणी; सढळहस्ते पदांचे वाटप

प्रशासनाने व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचे केलेले प्रयत्न निष्पळ ठरले. बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव थांबल्याने देशांतर्गत पुरवठा व्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. हे लक्षात घेऊन प्रशासनाने यावर पर्यायी व्यवस्था उभारणीचा तोडगा सुचवला. बाजार समिती कायद्यानुसार व्यापारी वा अन्य घटक संपावर गेल्यास कृषिमालाच्या खरेदी-विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उभारता येते. त्या आधारे बाजार समित्यांनी कांदा व्यापारासाठी इच्छुकांना नवीन परवाने द्यावेत तसेच तात्पुरते परवाने देऊन ही व्यवस्था सुरळीत करण्याची सूचना केली आहे. सहकार विभागाने सर्व बाजार समित्यांना ही सूचना केल्याचे जिल्हा दुय्यम निबंधक फय्याज मुलाणी यांनी सांगितले. नगर व अन्य जिल्ह्यातील व्यापारी नाशिकच्या बाजारात समितीत कांदा लिलावात सहभागी होण्यास उत्सुक असतात. या निमित्ताने त्यांना खरेदीत उतरवण्याची तयारी सुरू आहे.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

बुधवारी सकाळपासून स्थानिक व्यापारी लिलावापासून दूर झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पूर्णत: ठप्प झाले. जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एक लाख क्विंटलहून अधिकची आवक होते. व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे पहिल्या दिवशी २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली.

Story img Loader