अनिकेत साठे

महावितरणचा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न

कृषिपंप अर्थात शेतीला रात्रीच्या वेळी वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाण्याची कसरत करावी लागते. शेतीसाठी जेमतेम आठ ते १० तास वीज मिळते. त्यात अंधारात करावा लागणारा द्राविडी प्राणायाम पाहता ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा अखंडित, सुरळीत वीजपुरवठा मिळावा याकरिता सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्य़ात १९ ठिकाणी १०२ मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत सिन्नरच्या वावी येथील पहिल्या अर्धा वॉट क्षमतेच्या पथदर्शी प्रकल्पात प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू झाली आहे.

महावितरणच्या वीजपुरवठय़ाच्या प्राधान्यक्रमात शेती दुय्यम स्थानी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. शेतीला अधिक काळ, दिवसा वीज मिळत नसल्याचे वास्तव आहे. रात्री कधी तरी जेमतेम आठ तास वीज मिळते. शेतात वीज आली की शेतकऱ्यांना शेतात धाव घेऊन पाणी भरावे लागते. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे भवितव्य विहिरीतील पाण्यावर अवलंबून आहे. त्यात महावितरणच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना शेतात रात्र जागून काढावी लागत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले तरी त्याची दुरुस्ती लवकर होत नाही. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी पैसे मागत असल्याच्या तक्रारी आहेत. कृषी पंपधारकांकडे मोठी रक्कम थकीत आहे. त्याची वसुली व्हावी म्हणून व्याज, दंडातून माफीच्या योजना आणल्या गेल्या. परंतु, थकबाकीचे प्रमाण फारसे कमी झाले नाही.  सहा रुपये युनिट दराने खरेदी केलेली वीज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दीड रुपये युनिटने दिली जाते. तफावतीचा भार अन्य ग्राहकांकडून वसूल केला जातो. तफावत कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळी अखंडित, सुरळीत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना राबविली जात आहे. त्या अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जानिर्मिती प्रस्तावित आहे. उपकेंद्रातून शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीजवाहिनी उभारण्याचे नियोजन आहे. अपारंपरिक स्रोतातून उपलब्ध हरित ऊर्जा कायमस्वरूपी आणि कमी खर्चीक आहे. त्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागणार नाही. नाशिक जिल्ह्य़ात सरकारी, गायरान तसेच महावितरणच्या जागेत १९ ठिकाणी १०२ मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी दिली.

वावी येथील प्रकल्प कार्यान्वित

या योजनेतील पहिल्या प्रकल्पाची सिन्नरच्या वावी येथे मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. अर्धा मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पातून वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे. पुढील काळात अशा प्रकल्पाचे जाळे जितक्या भागात विस्तारले जाईल, तितक्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात.

Story img Loader