नंदुरबार – चार ते पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. आतापर्यंत राज्यातील २४ जिल्हे आणि १०३ तालुके या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यात कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झाले आहे; त्यामुळे नुकसानग्रस्तांना हमखास मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
रविवारी नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोकाटे यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना पालकमंत्री कोकाटे यांनी, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी एक- दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा संपूर्ण राज्याचा आराखडा समोर येईल.
हा आराखडा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे जास्तीत जास्त मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कोकाटे यांनी नमूद केले. नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर, आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चोहान सोमवारी नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी कोकाटे यांनी संवाद साधला.