राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अभियोग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केवळ तीन दिवस

मालेगाव : इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल लागून पाच महिन्यांचा अवधी उलटल्यावरही केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (सीबीएससी) अद्याप मूळ गुणपत्रिका, स्थलांतरित प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र न मिळाल्याने ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक

व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अभियोग्यता प्रमाणपत्र मिळविण्यात बाधा निर्माण झाली आहे. अभियोग्यता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आता केवळ तीनच दिवसांची मुदत शिल्लक असून त्यानंतर विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सीबीएससीद्वारे १० वी, ११ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक मंडळांतर्गत प्रवेश घेतल्यास त्यांचे परीक्षा मंडळ बदलते.

केंद्रीय मंडळाकडून राज्य परीक्षा मंडळाकडे स्थलांतरित होणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून अभियोग्यता प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य असते. त्यासाठी १० वी, ११ वीची मूळ गुणपत्रिका, स्थलांतरित प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक असते; परंतु सीबीएससी मंडळाने निकाल लागून मोठा कालावधी उलटला तरी अद्यापही मूळ कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभियोग्यता प्रमाणपत्र प्राप्त करणे शक्य झालेले नाही.

१० वी आणि ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश मिळवला आहे; परंतु ऑनलाइन कागदपत्रांच्या आधारे अभियोग्यता प्रमाणपत्र देण्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने नकार दिला आहे.

अभियोग्यता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी राज्य मंडळाने १५ ऑक्टोबपर्यंत मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत हे प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड होणार आहे.  सीबीएससी मंडळाने तातडीने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत किंवा राज्य मंडळाने नियमांचा बाऊ न करता या संदर्भात सुवर्णमध्य साधावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, सचिव प्रा. अनिल महाजन, प्रा. रवींद्र शिरोडे, प्रा. मिलिंद कुलकर्णी, प्रा. विश्वास पगार, प्रा. प्रफुल्ल निकम यांनी केली आहे.

Story img Loader