डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून २०११-१२ या वर्षांत येवला तालुक्यातील ज्या कर्जदार शेतकरी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड केली, अशा १८ हजार सभासदांचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत दोन कोटी ५२ लाख ३४ हजार २८५ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक किशोर दराडे यांनी दिली. तसेच नाशिक जिल्ह्य़ास उपरोक्त योजनेंतर्गत वेगवेगळ्या दोन वर्षांतील ११ कोटी ११ लाख ९७ हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

येवला तालुक्यात एकूण ८२ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. या संस्थांमधील १८००१ कर्जदार शेतकरी सभासदांनी शासनाने निश्चित करून दिलेल्या मुदतीत संस्थेकडून घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्ज रकमेची मुदतीत परतफेड केल्यामुळे महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी जाहीर केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ही रक्कम प्राप्त झाली आहे. त्यात एक लाख रुपयांपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेतलेल्या १८००१ कर्जदार शेतकऱ्यांनी २३२ कोटी ४२ लाख ६९५, तर एक लाखपासून ते तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या २०५७ कर्जदार शेतकऱ्यांनी १९ कोटी ९१ लाख ५९० कर्ज रकमेची परतफेड केलेली आहे. २०१२-१३ या वर्षांसाठी नाशिक जिल्ह्य़ास उपरोक्त योजनेंतर्गत ११ कोटी ११ लाख ९७ हजारांची अनुदान रक्कम प्राप्त झाली आहे. त्यात नांदगाव तालुक्यास (६७.७१ लाख), निफाड (४५९.१३) दिंडोरी (१८५.०५), सिन्नर (१००.०८), इगतपुरी (२७.५२) व त्र्यंबकेश्वर (२०.१२) या तालुक्यांचा समावेश आहे. उपरोक्त अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या जिल्हा बँकेतील खात्यात जमा करण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक आणि संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधकांवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील खातेदार शेतकरी सभासदांना अल्प मुदत पीक कर्जपुरवठा केला जातो. जे शेतकरी खरीप व रब्बी पीक कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करतात, अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याजात प्रोत्साहनपर सवलत देण्याची तरतूद या उपक्रमात आहे.

Story img Loader