नाशिक: मुंबईस्थित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या एकाला अर्धवेळ काम शोधणे चांगलेच महागात पडले. संशयितांनी भूलथापा देऊन संबंधिताला तब्बल ११ लाखाला गंडा घातला.
वेगवेगळ्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. याबाबत विनय अंगाडी (३४, पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी तक्रार दिली. अंगाडी मुंबई येथील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करतात. मे महिन्यात फावल्या वेळासाठी ते इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत होते. त्यावेळी टेलिग्रामच्या माध्यमातून संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अर्धवेळ काम देण्याचे आश्वासन दिले. नंतर त्यांना उद्दिष्ट देऊन गुंतवणुकीवर अधिकचा मोबदला देण्याची ग्वाही दिली.
हेही वाचा… नाशिक: दुचाकी चोरटे ताब्यात, आठ मोटारसायकल हस्तगत
या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. या प्रकरणात अंगाडी यांची ११ लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.