जळगाव – भडगाव तालुक्यातील आमडदे येथे वाळूने भरलेला भरधाव ट्रॅक्टर बुधवारी भल्या पहाटे नागरी वस्तीत शिरल्याने अकरावर्षीय मुलीचा नाहक बळी गेला. मृत मुलीची  आजी व बहीण (वय ५ वर्षे) गंभीर जखमी झाल्या आहेत.  दरम्यान, ट्रॅक्टरचालकाला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भडगाव तालुक्यातील आमडदे येथे पहाटे सव्वापाचच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर गावातील गणपतीनगर भागातील वस्तीत शिरला. अनियंत्रित झालेल्या या भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेमुळे चौथीत शिकणारी वैशाली सोनवणे (वय ११) जागीच ठार झाली, तर शेजारील तिची आजी बानूबाई वाघ (वय ४०) व पाच वर्षांची बहीण पिंकी सोनवणे  गंभीर जखमी झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नंदुरबारमध्ये तुफान दगडफेकीनंतर परिस्थिती पूर्ववत, २५ हून अधिक जणांना अटक!

त्यांना भडगावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत तीन-चार कच्ची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.  मृत वैशाली हिचे आई-वडील बांबरूड येथे मोलमजुरी करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आमडदे गावातील गणपतीनगर भागातील नागरी वस्तीत शिरलेल्या वाळूची चोरटी वाहतूक करीत भरधाव जाणार्‍या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज झाला. यात जखमी झालेल्यांनी आक्रोश केला. यामुळे परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागात कच्चे बांधकाम केलेली घरे असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेत ती कोसळली. तीन-चार कच्ची घरे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत या घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृत मुलीवर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा भिल्ल समाज संघटनेचे सुधाकर वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी भोसले यांच्यासह भिल्ल समाजबांधवानी घेतला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 yrear girl died on the spot in tractor accident zws
Show comments