जिल्ह्यात २४ तासात करोनाचे नव्याने १२ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या १४२ पर्यंत पोहचली आहे. शनिवारी मालेगाव येथील आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले. यामध्ये चार वर्षांच्या बालिकेसह महिला तर सहा पुरूष यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत नाशिक महापालिका क्षेत्रात ११ रुग्ण संक्रमित असून त्यातील एक बरा होऊन करोनामुक्त झाला आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्या १२६ वर पोहचली आहे. यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शनिवारी आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले. बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये जाफरानगर, उस्मानाबाद, हकिमनगर, नया इस्लामपुरा भागातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. नया इस्लामपुरा भागातील २५ वर्षांच्या महिलेसह चार वर्षांच्या बालिकेला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. तत्पुर्वी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये मालेगावचे दोन, तर प्रत्येकी एक येवला आणि नाशिक येथील आहेत. मालेगाव, येवला येथील रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाची मुंबईची पार्श्वभूमी आहे. खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी ही व्यक्ती मुंबईहून भंडारा जिल्ह्य़ात सहकाऱ्यांसोबत निघाली होती. नाशिकच्या हद्दीत संबंधितांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. नमुने तपासणीसाठी पाठविले असता संबंधित व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, २४ तासात मालेगावचे २३ अहवाल नकारात्मक आले. तर नाशिक शहरातील महापालिका, जिल्हा शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकूण ४५ जणांचे अहवाल नकारात्मक आले.

ज्या भागात नव्याने करोनाचे रुग्ण आढळून येतील, त्या भागात काही प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा तत्काळ बंद केल्या जातील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.

मनमाडमध्ये बाजार,दुकानांवरील निर्बंध कायम

केंद्र आणि राज्य सरकारने काही अटींवर दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढले असले तरी मनमाड शहर परिसरात चार दिवस बाजार आणि किराणा दुकाने पूर्णपणे बंदचे निर्बंध तीन मेपर्यंत कायम राहणार आहेत. मालेगाव तालुका करोनाचे केंद्र झाला आहे. मनमाडचे मालेगावशी असलेले विविध प्रकारचे संबंध विचारात घेता मनमाडसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली. किराणा, बेकरी दुकाने आणि भाजी बाजार आठवडय़ातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीनच दिवस सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील. संसर्ग टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने मनमाडच्या उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून घेणे बंधनकारक असल्याचेही डॉ. मेनकर यांनी सांगितले.