जळगाव: प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाची मान्यता मिळाली आहे. त्या लवकरच जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. जळगावसह पाचोरा, चोपडा व मुक्ताईनगर येथे चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी जळगावच्या विभाग नियंत्रकांना दिले आहेत. पाचोरा येथे २१, मुक्ताईनगरला १७, चोपडा २१, तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी ६२, अशा १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाने मान्यता दिली आहे.
जळगाव विभागात नोव्हेंबर २०१९ मध्ये ६३९ बस होत्या. सध्या ७२३ बस उपलब्ध आहेत. त्यांपैकी ५७ मोडकळीस निघाल्या आहेत. विभागात बर्याचशा बस जुन्या झाल्या असून, त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने रस्त्यात बंद पडतात. बर्याच बस उशिरा धावतात. काही वेळा फेर्या रद्द करण्याची नामुष्की ओढवते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार विभाग नियंत्रक बी. सी. जगनोर यांनी साध्या नवीन शंभर बससेवेचा मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून नवीन शंभर साध्या बस आणि १२१ इलेक्ट्रिक बस मिळाव्यात, अशी मागणी केली होती. त्याअनुषंगाने १२१ बससेवेला मान्यता मिळाली असून, निविदाप्रक्रिया सुरू आहे. दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यचा शासनाने निर्णय घेतला आहे