नाशिक – राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी विभागात इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडविताना नकल (काॅपी) करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.विभागातील नाशिक १२५, धुळे ४७, जळगाव ८१, नंदुरबार २८ याप्रमाणे २८१ केंद्रांवर परीक्षा होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १३ नवीन केंद्राची भर पडली आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालू राहणार आहे. एक लाख ६८ हजार १९६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी परीक्षा केंद्र गाठतांना पालक व विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. काहींचे केंद्र घरापासून लांब असल्याने त्यांना घरातून लवकर निघणे भाग पडले. परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने केंद्रांवर पालकांनी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि घरी परत नेण्यासाठी गर्दी केल्याने काही वेळासाठी केंद्रांभोवती वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून नंदुरबार येथील संवेदनशील केंद्र तसेच धुळे येथील परीक्षा केंद्रावर जिल्हा नजर ठेवली.
परीक्षा नकलमुक्त होण्यासाठी प्रशासनाकडून अभियान राबविण्यात आले असले तरी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील परीक्षा केंद्रावर दोन तर, धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एका विद्यार्थ्यास नकल करतांना पथकाने पकडले. धुळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरोडे यांनी सर्व केंद्रावर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली.
विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर येणारा ताण दूर करण्यासाठी मदतवाहिनी सुरू केली आहे. मंगळवारी या मदतवाहिनीवर विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी भीती व्यक्त केली. विज्ञान शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देत काही महाविद्यालयांनी खासगी शिकवणी वर्गांशी करार केला आहे. यामुळे मंडळाच्या परीक्षेची भीती वाटत असल्याचे अशा शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांनी सांगितले. शिकवणी वर्गातील परीक्षा आणि मंडळाची परीक्षा यामध्ये फरक असल्याने परीक्षेचा ताण आला. याशिवाय शिक्षकांना काही तांत्रिक अडचणींविषयी तक्रारी होत्या. काही विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन नसल्याने वेळ आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा साधावा, अशी विचारणा करण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd