जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व कुटुंबियांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना तब्बल १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यासंदर्भात मुक्ताईनगर येथील तहसीलदारांनी नोटीसही बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मुरूम उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी, खडसे परिवाराच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली असून, तेथून राष्ट्रीय महामार्गासाठी ४०० कोटींचे गौण खनिजाचे उत्खनन करीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याअनुषंगाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीची ग्वाही दिल्यानंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा… नाशिक: अमली पदार्थ खरेदी-विक्रीविषयी १० गुन्हे दाखल; शहरात कारवाईला वेग

पथकाच्या अहवालानंतर मुक्ताईनगर येथील तहसीलदारांनी खडसे कुटुंबियांना नोटीस बजावली. त्यात नोटिशीत सातोड शिवारातील खुल्या भूखंडातून अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याचे नमूद करीत अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी एक लाख १२ हजार ११७ इतके दाखविण्यात आले असून, नियमानुसार त्याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. आमदार खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ही जमीन असल्याने तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. आमदार खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचाही त्यात समावेश आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैधरीत्या गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. यात माझे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग आहे. १३७ कोटी रुपये दंडासंदर्भात नोटिशीवर अपील करता येते. मी सत्तेच्या विरोधात नेहमी बोलतो. आताही भाजपची सत्ता आहे. मी महसूलमंत्री असताना त्यावेळची प्रकरणे ते काढत आहेत. ईडी चौकशीतूनही काही त्यांच्या हाती लागले नाही. हा सर्व प्रकार राजकीय षडयंत्राचा खेळ आहे. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देणार आहे. मी आता पुणे येथे भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहे. एकनाथ खडसे (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 137 crores fine notice to eknath khadse family from muktainagar tehsildar in case of illegal minor mineral mining jalgaon dvr