नाशिक – उद्योग संचालनालयाच्यावतीने येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत १४२ उद्योगांशी सामंजस्य करार झाले. यातून सहा हजार ४०४ कोटींची गुंतवणूक झाली असून त्यामुळे १४ हजार ४०३ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातील काही उद्योगांनी जागा घेतल्या असून काहींचा जागेचा शोध प्रगतीपथावर आहे. पुढील एक-दोन वर्षात हे उद्योग कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथे गुंतवणूक परिषद २०२५ झाली. यावेळी ‘मैत्री’च्या समन्वय अधिकारी प्रियदर्शिंनी सोनार, उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधीक्षक प्रफुल्ल वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्यासह उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सामंजस्य करार झालेल्यांमध्ये उद्योग विस्तार आणि काही नवीन गुंतवणुकीचा समावेश आहे. यात अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातील उद्योगांचा अंतर्भाव आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य कराराचे वितरण विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले.
या ठिकाणी वायनरी उद्योग आणि पर्यटन क्षेत्रास अधिक संधी आहे. आगामी दोन वर्षात नाशिकच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. यात नाशिक ते पुणे आणि मुंबईपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवर नाशिकलाही याचा लाभ होईल. विमानतळामुळे हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने शहरासाठी पायाभूत सुविधांकरिता अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत. यात रस्ते, मेट्रोसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. उद्योगांचे लहान प्रश्नांचे स्थानिक पातळीवर निराकरण होणे गरजेचे असून मोठ्या धोरणात्मक प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून ते कसे सोडवावेत, यादृष्टीने नियोजन उद्योग
विभागाने करावे, असे त्यांनी सूचित केले. यावेळी सोनार यांनी मैत्री दोनची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सोनटक्के यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची तर वाणी यांनी भारतीय डाक विभागाच्या योजनांची माहिती सादर केली. सिंग यांनी उद्योग क्षेत्रातील निर्यात व औद्योगिक परिस्थिती यावर मार्गदर्शन केले.