जळगाव – जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीला जबाबदार धरून पोलीस आणि महसूल प्रशासनावर सर्व बाजुंनी टीका सुरू झाल्यानंतर, विशेषतः पोलिसांनी आता वाळू माफियांच्या विरोधातील कारवाईला गती दिली आहे. पोलीस प्रशासनाने आठ दिवसांमध्ये डंपर, ट्रॅक्टर, चारचाकी, दुचाकी यासारखी वाळू चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली एकूण १४६ वाहने जप्त केली आहेत.
जळगाव जिल्ह्यात पंधरवड्यात वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. या विषयाची चर्चा सुरु असतानाच मागील आठवड्यात जळगाव शहरात अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या एका विनानंबरच्या डंपरने दिलेल्या धडकेत बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त जमावाने डंपरच पेटवून दिला होता. अवैधपणे होणाऱ्या वाळू वाहतुकीशी संबंधित या दोन घटनांमुळे प्रशासनाला जाग आली. त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई सुरु केली.
हेही वाचा >>>उत्तर महाराष्ट्रात १३०० हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान
पोलीस प्रशासनाने आठ दिवसांमध्ये केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे ७० ट्रॅक्टर, १८ डंपर, चार जेसीबी, ४६ दुचाकी, पाच चारचाकी, तीन रिक्षा, एक यंत्र आणि २२ ब्रास वाळू जप्त केली. याशिवाय वाळू चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित फरार असलेल्या १३ संशयितांना अटक करण्यात आली असून, नव्याने २१ संशयितांच्या विरोधात १८ गुन्हे दाखल केले आहेत. जप्त केलेल्या विविध प्रकारच्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते आणि कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी व गस्ती मोहीम राबवून यशस्वी केली. वाळू माफियांच्या विरोधात सुरू झालेली कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमूद केले आहे.