नाशिक – हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी अकस्मात हल्ला केल्याने १५ ते् २० भाविक जखमी झाले. हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटेपासून भाविकांचे जत्थे अंजनेरी डोंगरावरील मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. डोंगर मार्गावरील पायऱ्यांवर एकाने शंखध्वनी केला. त्या आवाजाने माकडे सैरभैर पळाली आणि आसपासच्या पोळ्यावरील माशा उठल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत अंजनेरी येथे डोंगरावर हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. या ठिकाणी मंदिर आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या व दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर, आदल्या दिवशीपासून भाविक अंजनेरी येथे येण्यास सुरुवात झाली. शनिवारी भाविकांची मोठी गर्दी उसळली.  सध्या नाशिकचा पारा ४१ अंशावर गेलेला आहे.

तळपत्या उन्हात डोंगरावर जाणे दमछाक करणारे ठरते. त्यामुळे पहाटेपासून भाविक डोंगरावर निघाले होते. सकाळी पायऱ्यांवरील मार्गावर कोणीतरी शंखध्वनी केला आणि माकडे पळू लागली. यावेळी आसपासच्या पोळ्यांना धक्का लागल्याने मथमाशा उठल्या आणि त्यांनी हल्ला चढविला, अशी माहिती अंजनेरी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश चव्हाण यांनी दिली. तर कोणीतरी पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशांचा हल्ला झाल्याची चर्चा भाविकांमध्ये होती.

अकस्मात हल्ल्यामुळे पायरी मार्गावर एकच धावपळ उडाली. पायऱ्या सोडून डोँगरावर इतरत्र आसरा घेणे अनेकांना भीतीदायक वाटले. या हल्ल्यात एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या भाविकांना डोंगरावरून खाली आणण्यात आले. यातील चेतन भगत यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या शरिरातून २०० काटे काढण्यात आले. त्यांना अधिक उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तर अभिषेक साठे, बापू दरेकर, चंद्रकांत नेते, सुरेश वाणी (सर्व नाशिक) हे जखमी झाले.

रुग्णवाहिकेद्वारे त्यांना अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रात आणून उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी आशिष सोनवणे यांनी दिली. अनेक भाविकांना मथमाश्यांनी डंख मारला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायथ्याशी वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले. अंजनेरी गावातून डोंगरावरील मंदिरात जाण्यासाठी साधारणत दीड तास लागतो. अर्धा ते पाऊण तासानंतर स्थिती पूर्ववत झाली. दर्शनासाठी भाविकांची डोंगरावर ये-जा सुरळीत असल्याचे गणेश चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी अंजनेरी डोंगरावर मधमाशांच्याा हल्ल्याची घटना घडलेली आहे. छेडछाड झाल्याशिवाय त्या कधीही हल्ला करीत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.