नाशिकमध्ये पतंग उडवताना तोल गेल्याने तिसऱ्या मजल्यावरुन पडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मकरसंक्रातीच्या दिवशी घडली. सुफियन कुरेशी (वय १६) असे या मुलाचे नाव आहे.
मकरसंक्रातीच्या पर्वावर देशाच्या विविध भागात पतंगांचा उत्सव सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी नाशिकच्या जेलरोड भागातील मोरे मळा येथे राहणारा सुफियन कुरेशी हा मुलगा पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडला. तो परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत पतंग उडवण्यासाठी गेला. पतंग उडवत असताना सुफियनचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नायलॉनच्या मांजाचा वापर करु नका, पतंग उडवताना मुलांनी सतर्क राहावे, पालकांनाही मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे.