रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत भडगाव शहरातील बाळद रोड भागातील रहिवासी तरुणाची सुमारे १७ लाखांना फसवणूक करण्यात आली. संशयितांनी बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी भडगाव येथील पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>जळगाव : जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून हुरड्याचा आस्वाद
भडगाव शहरातील बाळद रोड भागातील रहिवासी रंगनाथ साहेबराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मुलगा अक्षय पाटील यास रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून संशयितांनी विश्वास संपादन करीत फिर्यादीकडून तालुक्यातील वडजी व नाशिक येथे पंधरा लाखांची रोकड नऊ मे २०२२ पूर्वी स्वीकारली होती, तसेच नोकरीसाठी नोटरीदेखील करून दिली आहे. मात्र, तक्रारदारास बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले आणि त्यावर अधिकार्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांकडे रकमेची मागणी केली असता, घेतलेली रक्कम परत न केल्याने भडगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील प्रकल्पात भ्रष्टाचाराचा भाजप आमदाराचा आरोप
नोकरीसाठी दिलेले १५ लाख व झालेला अन्य दोन लाखांचा खर्च, अशा सुमारे १७ लाखांना फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत रंगनाथ साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव येथील पोलीस ठाण्यात संशयित धनराज हाके (रा. कमालवाडी, ता. जि. लातूर), मुन्ना कुवर (रा. वारस, ता. साक्री, जि. धुळे), सुनील मानकर, प्रतिभा मानकर (रा. नाशिक), कदम (रा. मुंबई, पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.