नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध शस्त्रसाठा विशेष शोध मोहीम राबवून पोलिसांनी पाच गावठी बंदुका, सहा काडतूस तसेच १८ कोयते, तलवारी, तीन चाकू जप्त केले.
परिमंडळ (दोन) अंतर्गत राबवलेल्या मोहिमेत सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प परिसरात झाडाझडतीत २५७ संशयित सापडले. त्यात ३३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३८ जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत पाच गावठी बंदुका, १८ कोयते, नऊ तलवारी, तीन चाकु जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहील, असे आयुक्त कर्णिक यांनी सांगितले.
हेही वाचा – हेमंत गोडसे यांच्यावर साडेसहा कोटींचे कर्ज
हेही वाचा – डॉ. भारती पवार यांच्या मालमत्तेत दुप्पट वाढ
उपायुक्त मोनिका राऊत यांनी १६ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत शस्त्रसाठा जप्त मोहीम राबवली. नाशिक परिमंडळ (एक) अंतर्गत या मोहिमेत ५८ प्रकरणे पुढे आली. यात १० प्रकरणात गावठी बंदुका सापडल्या. याशिवाय तलवार, कोयता, सुरा अशी ६३ हत्यारे जप्त करण्यात आली. अवैध दारुची १४९ प्रकरणे आहेत. अमली पदार्थ प्रकरणात २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर नऊ प्रकरणात ३४ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.