नाशिक – नंदुरबार शहरात रविवारी किरकोळ अपघातामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत एका गटातील काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले असून त्यातील सात जण हे अल्पवयीन आहेत.
नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात रविवारी मद्यप्राशन केलेल्या रिक्षाचालकाने दुसऱ्या गटातील व्यक्तीला धडक दिली. या अपघातामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा दोन गटांमध्ये किरकोळ घटना घडल्या. पोलिसांनी सतर्कता म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला होता. या तीनही घटनांप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत धरपकड सुरु केली होती. रात्री १० वाजेच्या सुमारास त्रिकोणी इमारत, हलवाई मोहल्ला आणि चिराग गल्ली परिसरातील काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेड सुरु केली. बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांवर अचानक झालेल्या दगडफेकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा – अतुल भोसले यांच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाण यांचे उच्च न्यायालयात आव्हान
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांची अतिरीक्त कुमक दाखल झाली. त्यांनी तत्काळ कारवाई सुरु केली. अश्रुधुराच्या १० ते १२ नळकांड्या फोडत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दगडफेकीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका पोलीस वाहनाचे नुकसान झाले असून बंदोबस्तावरील काही अधिकारी, कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपासून या परिसरातील तणाव निवळण्यास सुरुवात झाली. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा – मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला
सात संशयित अल्पवयीन
नंदुरबारमधील दगडफेकप्रकरणी आतापर्यंत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी सात जण अल्पवयीन आहेत. ज्यांनी कायदा हातात घेवून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सोडले जाणार नाही. शहरात शांतता आहे. कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये. कुठलीही अनुचित घटना दिसून आल्यास पोलिसांना योग्य प्रतिसाद द्यावा. – श्रवणदत्त एस. (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)